मुक्ताईनगर : शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे गरजेचे आहे. यातून चोऱ्यादेखील रोखता येणार आहेत. चार वर्षांपूर्वी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही चोरी झाली आहे.
मुक्ताईनगर शहरातील विविध भुरट्या चोऱ्या, तसेच महाविद्यालय सुरू असताना बऱ्हाणपूर रस्त्यावरील महाविद्यालय व वरणगाव रस्त्यावरील महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्रास होऊ नये व छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फार मोठा उपयोग होत होता; परंतु पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बसविण्यात आलेली यंत्रणा कुचकामी ठरली. नव्हे तर चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले आहे.
पो. नि. कडलग गेले अन् कॅमेरेही बंद...
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये चार वर्षांपूर्वी अशोक कडलक हे पोलीस निरीक्षक असताना त्या काळात संपूर्ण मुक्ताईनगर शहरावर वाॅच ठेवण्यासाठी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे करून बोदवड चौफुलीपासून बसस्थानक मुक्ताईनगर, प्रवर्तन चौक, साई चौक, एसटी डेपोसमोरील मार्ग ते खडसे महाविद्यालय आणि बऱ्हाणपूर रस्त्यावरील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय अशा जवळपास ३० ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
विशेष म्हणजे कडलक हे पोलीस निरीक्षक असेपर्यंत वर्षभर हे सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत सुरू होते. त्यामुळे अनेक वेळेला गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याचा उपयोगदेखील झाला. प्रांजली मोबाइल शॉपीमध्ये चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग केलेला होता; परंतु कडलक यांची बदली झाल्यानंतर मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. कडलक यांच्याच काळात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी व मेंटेनन्ससाठी पत्रव्यवहारदेखील केला होता; परंतु तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी हा खर्च पोलीस मुक्ताईनगर पोलिसांनी तेथीलच वेल्फेअर फंडामधून करावा, असे सांगितल्याने ही योजना थंडबस्त्यात पडली.
कडलक यांच्या बदलीनंतर मात्र कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलची चोरी नव्हे, तर तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील चोरट्यांनी चोरी करीत हे कॅमेरे पळवून नेले.