मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक भागाला बुधवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. कुऱ्हा परिसरात अनेक नदी नाल्याना पूर आला. यात सुळे येथील पार्थ नदीला पूर आल्याने नदीकाठावर उभी असलेली चारचाकी वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने काही अंतरावर याच नदीवर असलेल्या लहान पुलात हे वाहन अडकून थांबले.
पहाटेच्या पावसाने परिसरात अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला. यात कुऱ्हा गावातून वाहणाऱ्या गोरक्ष गंगा नदीलादेखील जोरदार पाणी आल्याने नदीच्या पुलावर व लगतच्या भागातील किरकोळ दुकानांना फटका बसला.
सुळे पाठोपाठ चिचखेड बुद्रुक शेती शिवारात धो धो पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लागवड झालेले बागायती कापूस पीक वाहून तर अनेक शेतांचे बांध फुटले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सुळे येथील नदीत वाहून गेलेले चारचाकी वाहन हे दिनकर इंगळे या ग्रामस्थाचे आहे, तर एक बैलगाडी वाहून पुढे गालात नदीला पहाटे पाणी आल्याने नदीकाठी असलेल्या गोठ्यात पाणी शिरल्याने गुरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले असल्याची माहिती पशुधन मालकांनी दिली. ही प्राथमिक माहिती असली तरी उशिरापर्यंत परिसरात पावसामुळे कोठे नुकसान झाले आहे याची माहिती प्रशासन स्तरावर घेतली जात आहे.