जळगाव : कोरोनामुळे १० जुलैपासून तात्पुरती स्थगित असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २४ आॅगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी विमान कंपनीतर्फे नुकतीच तिकिट विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच्या तीन महिने बंद असलेली जळगावची विमानसेवा १ जूनपासून पुन्हा सुरू झाली होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे विमान कंपनीतर्फे खबरदारी म्हणून जळगावची विमानसेवा १० जुलैपासून स्थगित करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चार महिन्यात दोन वेळा सेवा स्थगित करण्याची वेळ विमान कंपनीवर आली. लॉकडाऊनच्या कालावधीतही विमानसेवा सुरू झाली असली तरी जळगाव विमानतळावरून फक्त २० टक्केच प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.यामुळे विमान कंपनीचे आठ कोटींच्या घरात नुकसान झाले. यात मुंबई विमान तळावर विमान उतरविण्यासाठी जागा नसल्यामुळे आठवड्यातून फक्त एकदाच मुंबईची सेवा सुरू होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याचेही विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली असून प्रवाशांना आॅनलाईन किंवा विमान तळावर जाऊनही तिकीट खरेदी करता येणार आहे.मुंबईची सेवा दररोज सुरू करण्यासाठी प्रयत्नकोरोनामुळे राज्य सरकारने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून फक्त २५ विमान कंपन्यांनाच विमान उतरविण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये जळगावला विमान सेवा देणाऱ्या कंपनीचादेखील समावेश असून या कंपनीला सध्या आठवड्यातून एकदाच विमान उतरविण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे मुंबईची विमानसेवा दररोज सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहितीही विमान कंपनीतर्फे देण्यात आली.कोरोनामुळे स्थगित असलेली जळगाव ते मुंबई विमानसेवा २४ आॅगस्टपासून पुन्हा सुरू करीत आहोत. यासाठी तिकीट विक्रीला सुरूवात करण्यात आली आहे. शक्य झाले तर १० आॅगस्टपासूनच विमानसेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.-नैमिष जोशी, वितरण व्यवस्थापक, ट्रू जेट एअरलाईन्स.