मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक संघटनात्मक बदलांवर ऊहापोह झाला. यात जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्यापासून ते उपाध्यक्ष अविनाश भालेराव, राजीव पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे अशी नावे आता आगामी जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत येत आहेत. ॲड. संदीप पाटील यांच्याबद्दल दोनही मतप्रवाह या बैठकीत उमटले. आमदार शिरीष चौधरी यांना पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या बैठकीत देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांचा विचार केला असता होणारे हे बदल काँग्रेससाठी अत्यावश्यक असल्याचा सूर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांकडून उमटतो. येत्या सहा ते आठ महिन्यांत जिल्हा परिषदेची मोठी निवडणूक राहणार आहे. यासह पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची ताकद सद्य:स्थितीत कमी आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे चार सदस्य आहेत. मात्र, त्यातील एक सदस्य हे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे कागदावर चार, प्रत्यक्षात तीन सदस्य अशी काँग्रेसची जिल्हा परिषदेत अवस्था आहे. त्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्या दिल्यानंतर आता आपल्यालाही स्वबळाच्या ताकदीवरच पुढील निवडणुकांमध्ये उतरायचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केले आहे. त्या मानाने काँग्रेसकडे वेळ कमी आहे. त्यामुळे होणारे बदल हे संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने अगदी विचारपूर्वक करावे लागणार आहेत. मात्र, त्यात स्मार्ट वर्क ही संकल्पना काँग्रेसला राबवावी लागणार आहे. मात्र, स्थानिक काँग्रेसकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिल्याचा एक संदेश मुंबईच्या बैठकीतून गेला आहे, जो अनेक झोपलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जागे करणारा आहे.
मुंबईतील बैठक काँग्रेससाठी पोषक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:12 AM