लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना करण्यात येत असून, आता तीन दिवसांचा लॉकडाऊनही करण्यात आला; मात्र जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने, यातून कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाणी फिरत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दररोज एक हजाराहून अधिक नागरिक कोरोना बाधित आढळून येत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. एकीकडे शहरात प्रशासनातर्फे कडक उपाययोजना व नागरिकांमध्ये ही मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वेळोवेळी हात निर्जंतुक करण्याचे आवाहन करीत जनजागृती करण्यात येत आहे; मात्र तरीदेखील शहरात व काही तालुक्यांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकाराला बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे कारण कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे व ट्रॅव्हल कंपन्यांतर्फे या प्रवाशांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत असली तरी, ही तपासणी म्हणावी तशी खात्रीशीर होत नाही. त्यामुळे या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट पाहूनच गावाकडे येण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो
एकूण कोरोना रुग्ण
८६ हजार ६८८
बरे झालेले रुग्ण - ७३ हजार ६६५
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ११ हजार ४२६
गृह विलगीकरणातील रुग्ण -
७ हजार ११२
एकूण बळी - १ हजार ५९७
इन्फो :
दररोज २ ते ३ हजार प्रवासी येतात
१) एस. टी. बस
जळगाव आगारासह जिल्हाभरातील आगारातून ८ ते १० बसेस पुण्याला जात आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असला तरी, २०० ते २५० प्रवासी बसने पुण्याहून येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
२) ट्रॅव्हल्स
एस. टी. पेक्षा प्रवाशांची ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती आहे. सध्या जिल्हाभरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी २० ते २५ बसेस ये-जा करतात. त्यानुसार पुणे व मुंबई या ठिकाणाहून दररोज जिल्हाभरात ७०० ते ८०० प्रवासी येत असल्याचे सांगण्यात आले.
३) रेल्वे
सध्या कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादितच गाड्या सुरू असल्या तरी पुणे व मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात ८ ते १० गाड्या आहेत. एसटी व ट्रॅव्हल्सपेक्षा प्रवाशांची रेल्वेला पसंती असल्यामुळे दररोज रेल्वेने पुणे व मुंबई या ठिकाणाहून दोन ते अडीच हजार प्रवासी येत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
रेल्वे व ट्रॅव्हल्सने येणाऱ्यांची चाचणी; मात्र महामंडळातर्फे विना चाचणी प्रवास
- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. स्टेशनवर तिकीट तपासणीवेळी प्रवाशांचे तापमानही तपासण्यात येत आहे. तसेच संबंधित स्टेशनावर उतरल्यावरही प्रवाशांचे तापमान मोजण्यात येत आहे.
- तसेच खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई व पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांचीही संबंधित ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे बसमध्ये प्रवासी चढण्याअगोदर तापमान मोजण्यात येत आहे, तरच ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
- अशा प्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना, एस.टी.महामंडळातर्फे कुठलीही तपासणी केली जात नसल्याचे सांगण्यात आले. सध्या जळगाव आगारातून पुण्यासाठी दररोज दोन बसेस व मुंबईसाठी एक बस जात आहे; मात्र बसमधून प्रवासी नेताना, ना उतरल्यावर प्रवाशांची कुठलीही चाचणी होत नसल्याचे सांगण्यात आले.