फोटो : ११सीटीआर ५५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेसमोर अडचणींचा डोंगर उभा असून, शहरातील नागरिक सुविधांचा प्रतीक्षेत आहेत. राज्य व महापालिकेत सेनेची सत्ता असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शहरासाठी मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत कोणतीही ठोस घोषणा केली नाही. तसेच गाळे प्रश्न, शंभर कोटींच्या प्रश्नासह हुडको कर्जाचा विषयासाठी नगरविकास मंत्र्यांनी मुंबईला या सर्व विषय मार्गी लावतो असे आश्वासन देत मुंबईला निघून गेले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नियोजित वेळेपेक्षा तब्बल सात तास उशिराने महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदींसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सादर केली मागण्यांची यादी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहराचे विविध प्रश्नांसह मनपातील प्रलंबित निधी व योजनांची यादी नगरविकास मंत्र्यांसमोर सादर केली. यामध्ये शासनाने स्थगिती लावलेल्या ४२ कोटींचा निधीवरील स्थगिती उठविण्यात यावी. हुडको कर्जापोटी राज्यशासनाने भरलेल्या रक्कमेचे कर्ज फेडण्यात यावे, गाळे प्रश्न, आकृतीबंधासह मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानाचा विकासासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच नगरपालिकांमधील अभियंत्यांचा रिक्त जागा भरण्याची मागणी केली.
सुची तयार करा, तत्काळ सुटणारे प्रश्न मार्गी लावू
पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीनंतर नगरविकास मंत्र्यांनी मनपा प्रशासनाला विविध प्रलंबित विषयांबाबत सुची तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच ही यादी घेवून मुंबईत नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेवून जे विषय तत्काळ मार्गी लावता येतील असे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
नगरविकास मंत्र्यांनी दिलेली आश्वासने
१. गाळेप्रश्नांबाबत सर्वकष तोडगा काढण्याची गरज असून, याबाबत गाळेधारकांसोबत मुंबईत बैठक घेवून धोरण ठरविण्यात येईल.
२. शहराचा विकास आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तत्काळ सादर करा, त्यावर नगरविकास मंत्रालयाकडून तत्काळ मंजुरी दिली जाईल.
३. मनपाचा प्रलंबित आकृतीबंधाचा नव्याने प्रस्ताव तयार करून, तो प्रस्ताव पाठवावा त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.
४. ४२ कोटींच्या कामांबाबत देखील मनपा अधिकाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र बैठकीसाठी वेळ देण्यात येईल. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल.
५. मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानाचा विकासाठीचा प्रस्ताव पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर करून, तो मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
उत्पन्नांचे स्त्रोत वाढवा, लोकसहभागातून कामे करण्याचा सल्ला
नगरविकास मंत्र्यांनी आढावा बैठकीत कोणत्याही नवीन निधीची घोषणा न करता, मनपा प्रशासनाला आपल्या उत्पन्नांचा स्त्रोत वाढविण्याचा सूचना नगरविकास मंत्र्यांनी दिल्या. तसेच जळगाव शहरात देखील ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबवली मनपाप्रमाणेच लोकसहभागातून कामे करण्यावर भर द्या अशा सूचना नगरविकास मंत्र्यांनी या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभा, महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. मात्र, शनिवारी नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पाय ठेवण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती. तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांची या बैठकीत पायमल्ली करण्यात आली.
बैठकीसाठी अधिकारी व पदाधिकारी दिवसभर ताटकळले
नगरविकास मंत्र्यांचा उपस्थितीत होणारी ही बैठक दुपारी १२.३० वाजता घेण्यात येणार होती. मात्र, एकनाथ शिंदे मुंबईहूनच उशीराने निघाल्यामुळे त्यांच्या नियोजीत कार्यक्रमांवर परिणाम झाला. तसेच महापालिकेतील नियोजीत बैठक सोडून,नगरविकास मंत्री पाचोरा येथील विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमासाठी रवाना झाल्यामुळे महापालिकेतील बैठक तब्बल सात उशीराने रात्री ७.३० वाजता सुरु झाली. यामुळे मनपा अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी दिवसभर महापालिकेतच ताटकळत बसले.