जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाही रेल्वे गाड्यांना मात्र प्रवाशांची उत्स्फूर्त गर्दी आहे. यामुळे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचे आरक्षण वेटींगवर आहे. तर जळगावहून दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांनाही हीच परिस्थिती असल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे सध्या रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादितच गाड्या सुरू आहेत. तसेच या गाड्यांनाही प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने आरक्षण असल्यावरच प्रवास करणे बंधनकारक केले आहे. सध्या जळगाव स्टेशनवरून कोरोना स्पेशल ३० गाड्या धावत आहेत. मात्र, कोरोना काळातही या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव स्टेशनवरून २५ मार्च ते ३० मार्च दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे सांगण्यात आले. तसेच जळगावहून दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांनाही ३० मार्च पर्यंत आरक्षण फुल्ल असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे प्रवाशांची संख्या मोठी असतांना, दुसरीकडे सध्या कोरोना काळात मर्यादितच गाड्या सुरू आहेत. त्यामुळे या गाड्यांची संख्या अपूर्ण पडत असल्याने, परिणामी या गाड्यांचे तिकीट वेटींगवर राहत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
रोज धावताहेत ३० रेल्वे
साध्य जळगाव स्टेशनवरून २४ तासात ३० सुपरफास्ट गाड्या धावत आहेत. तसेच यामध्ये सुरतकडे जाणाऱ्या अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, सुरत पॅसेंजर व इतर सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे. या कोरोना स्पेशल गाड्या व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनातर्फे साप्ताहिक गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत. अप व डाऊनमार्गे अशा दिवसभरात एकूण ३० गाड्या धावत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
मुंबई व दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर वेटींगच
सध्या रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईकडे जाणाऱ्या हावडा एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, पंजाब एक्स्प्रेस या गाड्यांना ५० ते ६० प्रवाशांपर्यंत वेटींग आहे. तर दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस,राजधानी एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेस या गाड्यांना १०० ते १५० पर्यंत वेटींग आहे. झेलम एक्स्प्रेसला तर ‘नो रूम ’ म्हणजे वेटींगचे तिकीटही मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
साप्ताहिक गाड्यांना वेटींग नाही
सध्या सुरू असलेल्या गाड्या मर्यादित असल्यामुळे आणि या गाड्यांनाही आरक्षण लवकर मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी व रविवारी साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये राजस्थान, दिल्ली, मुंबई व नागपूर या मार्गावर साप्ताहिक गाड्या सुरू असून, या गाड्यांना वेटींगला तिकीट नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
एप्रिल मध्येही काही गाड्यांचे आरक्षण फुल्ल
साधारणतः एप्रिल मध्ये शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा संपण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे नागरिक आतापासूनच तिकीट आरक्षण करीत असून, मुंबई व दिल्लीकडे जाणाऱ्या हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल, कामायानी एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेसचे पुढील महिन्यातील काही तारखांचे आतापासूनच तिकीट आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्यांना आरक्षण फुल्ल आहे. कोरोनाकाळात मर्यादित गाड्या असल्यामुळे आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी आहे. तसेच प्रवासी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाण्यासाठी आतापासूनच तिकीट आरक्षणाला प्राधान्य देत आहे.
-अमरचंद अग्रवाल, स्टेशन प्रबंधक, जळगाव रेल्वे स्टेशन