लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत जात आहे. त्यात महापालिका प्रशासनाने कुत्र्यांवर होणारा निर्बीजीकरणाचा करार देखील रद्द केला आहे. तसेच नवीन निविदा प्रक्रिया देखील अजून राबवली नसल्याने हा प्रश्न गंभीर होत जात आहे. खराब रस्त्यांमुळे दिवसा वाहनधारकांना खड्डे चुकवत मोठी कसरत करावी लागते. तर रात्रीच्या वेळेस मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालवणे देखिल कठीण झाले आहे.
शहरात सद्यस्थितीत मोकाट कुत्र्यांची संख्या वीस हजार पेक्षा जास्त झाले आहे. तसेच गेल्या वर्षभरात ३०० पेक्षा अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी झाले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना कुत्र्याचे पिल्ले भेट देउन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मोकाट कुत्र्यांसंदर्भात महापालिका लक्ष देईल असे वाटत होते. मात्र महापालिका प्रशासनाने कोणतीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. त्यात वर्षभरापूर्वी महापालिकेने अमरावती येथील संस्थेला मोकाट कुत्र्यांचा संदर्भात निर्बीजीकरणाच्या दिलेला मक्ता देखील आता रद्द केला आहे. केंद्र शासनाचा ॲनिमल वेलफेअर असोसिएशनने या कंपनीच्या कामाबाबत आक्षेप घेतले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने निर्मिती करण्याचा मक्ता रद्द केला.
रात्रीच्या वेळेस वाहने चालवणे झाले कठीण
शहरातील रस्ते आता नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सकाळच्या वेळेस धूळ आणि खड्ड्यांमुळे वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर रात्रीच्या वेळेस देखील शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यामुळे समस्या निर्माण होत आहे. शिवाजीनगर, वाघ नगर, आहुजा नगर, अयोध्या नगर, कानळदा रस्ता, ममुराबाद रस्ता , निमखेडी शिवार या भागात रात्रीच्या आठ नंतर वाहने चालवताना मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वाहनधारकांवर हल्ला करत आहेत. शनिवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांचा देखील मोकाट कुत्र्यांमुळे अपघात झाला. त्यात गुप्ता काही प्रमाणात जखमी झाले आहेत. शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात देखील होत आहेत.
केंद्र शासनाच्या परवानगीनंतर काढण्यात येईल निविदा
महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठीची नवीन निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी लोकमतला दिली. मात्र या निधीसाठी अटी व शर्ती केंद्र शासनाचा समितीकडून निश्चित केला जाणार आहेत. केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरणाची निविदा प्रसिद्ध केली जाईल अशी ही माहिती पवन पाटील यांनी दिली.