लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील आव्हाणे शिवार भागातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल सात वर्षांपासून वीज पुरवठा नसून, २०१३ मध्ये हंजीर बायोटेक कंपनीने महावितरणचे ७ लाख ५६ हजार रुपयांचे बील थकविल्याने महावितरण प्रशासनाने मनपा प्रशासनाला याठिकाणी नवीन वीज कनेक्शन द्यायला नकार दिला आहे. दरम्यान, मनपाला आता पुढील कामासाठी वीज पुरवठा आवश्यक असल्याने हंजीर बायोटेक कंपनीने थकविलेले महावितरणचे बील आता मनपा प्रशासनाला भरावे लागणार आहे.
२०१३ मध्ये मनपा प्रशासनाने शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हंजीर बायोटेक कंपनीला ठेका दिला होता. मात्र, हे काम अपुर्णावस्थेत सोडून हंजीर बायोटेकने हे काम थांबविले होते. याबाबत संबधित ठेकेदार व मनपा प्रशासनामध्ये याबाबत न्यायालयात एकमेकांविरोधात दावा दाखल आहे. दरम्यान, २०१३ मध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी काम करण्यासाठी हंजीर बायोटेक कंपनीने महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले होते. मात्र, महावितरणचे बील संबधित कंपनीने भरले नव्हते. ही जागा मनपा प्रशासनाच्या मालकीची असल्याने या जागेवरून वापरण्यात आलेल्या वीज बीलाची रक्कम ही मनपाकडून वसुल केली जाणार आहे.
७ लाखांचे बील १५ लाखांवर
मनपा प्रशासनाने हे बील भरण्यास नकार दिला होता. महावितरणने हे बील हंजीरकडून वसुल करण्याबाबत सांगितले होते. मात्र, महावितरणने नकार दिला आहे.आता पुढील प्रकल्पाच्या ठिकाणी नव्याने वीज कनेक्शन आवश्यक असून, बील न भरल्याने महावितरण प्रशासनाने याठिकाणी वीज कनेक्शन द्यायला नकार दिला आहे. २०१३ मध्ये हंजीरकडे ७ लाख ५६ हजार रुपयांचे वीज बील थकीत होते. मात्र, आता दंडाची रक्कम मिळून आता १५ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे. पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढून मनपाने ११ लाख रुपयांचे बील महावितरणला अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा हंजीरकडून वसुल करणार बीलाची रक्कम
हंजीर बायोटेक कंपनीने थकविलेले बील मनपा प्रशासनाला भरावे लागणार असून, ही रक्कम हंजीरकडून वसुल करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मात्र, याआधी हंजीरसोबत वाद सुरु असून, ही रक्कम वसुल होणे कठीण असल्याने, मनपाला ११ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हे बील न भरल्यास मनपाला प्रकल्पाच्याठिकाणी वीज कनेक्शन भेटणे कठीण होईल.