लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या गाळेधारकांवर मंगळवारपासून कारवाईला सुरुवात झाली, मात्र काही गाळेधारकांनी महापौरांकडे विनंती केल्यानंतर पुढील कारवाई काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. दरम्यान महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम भरण्याचा सूचना दिल्या असून, ही रक्कम न भरल्यास कारवाईचा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे.
महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत महापौरांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, तेजस देपुरा, राजेश कोतवाल, पंकज मोमाया यांच्यासह गाडा तारा संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळेधारकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती गाळेधारकांनी दिली. तसेच ही बैठक होणार नाही तोपर्यंत गाळे कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
रक्कम भरल्याशिवाय पर्याय नाही
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाई बाबत संपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार गाळेधारकांनी नुकसानभरपाईची रक्कम भरावी, न्यायालयाने देखील याबाबत मनपा प्रशासनाला सूचना दिल्या असल्याची ही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच गाळेधारकांना नुकसान भरपाई व थकीत भाड्याची रक्कम भरल्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचेही आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले.
दोन दिवसात तोडगा काढू - महापौर
याबाबत गाळेधारकांवर अन्याय होणार नाही तसेच महापालिकेचे देखील आर्थिक नुकसान होणार नाही. असा मधला मार्ग काढून निर्णय घ्यावा लागणार असल्याची माहिती यांनी दिली. तोपर्यंत दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील, अशी ही माहिती महापौरांनी दिली.