लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत मिळालेल्या १०० पैकी ४२ कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविल्याने आता लवकरच कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. या कामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी मनपा प्रशासनाला पत्र पाठवून, स्वतंत्र बँक खाते उघडण्याची सुचना महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारपर्यंत स्वतंत्र खाते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.
शहरातील मुलभूत विकास कामांसाठी तत्कालीन राज्य शासनाने १६ ऑगस्ट २०१८ रोजी मनपाला १०० कोटींचा निधी मंजुर केला होता. मात्र, मनपातील सत्ताधाऱ्यांना वेळेवर नियोजन करता आले नाही, त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वर्षभरापासून स्थगिती मिळाली होती. नुकतीच राज्य शासनाने १०० पैकी ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठविली आहे. स्थगिती उठवली आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने श्रीश्री एबीडब्लू लिमीटेड या कंपनीला मक्ता देण्यात आला असून, लवकरच या कार्यादेश देवून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
मनपाचा १२ कोटींचा हिस्सा
या कामांसाठी राज्य शासनाचा ७० टक्के अर्थात ३० कोटी तर महापालिकेचा ३० टक्के अर्थात १२ कोटींचा हिस्सा आहे. मनपाने आपल्या हिस्स्याचे ५ कोटी रूपये आधीच वर्ग केले उर्वरीत ७ कोटी द्यायचे आहेत. ४२ कोटीतून होणाऱ्या कामांना तातडीने सुरूवात करावी यासाठी नुकतीच महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. तसेच या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी बँक खाते उघडावे लागणार असल्याने पत्र देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे.