लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी शहरातील विविध भागात सर्वच गर्दीच्या ठिकाणांवर नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी ६ हजार अँटीजन किट ची खरेदी केली आहे. तसेच लवकरच १० हजार अँटीजन किट खरेदी केले जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
यापुर्वीच १६ हजार किटची मागणी नाेंदविण्यात आल्याने साठा संपण्यापुर्वी सहा हजार किट प्राप्त झाले. दरराेज एक हजारापेक्षा जास्त नागरीक बाधित हाेत आहेत. शहरात देखील दरराेज २०० ते ३०० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत आहेत. रूग्ण वाढीची साखळी ताेडण्यासाठी महापालिकेने आता थेट नागरीकांपर्यंत जाऊन काेराेनाची चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला पाॅलिटेक्निक काॅलेज या एकाच ठिकाणी तपासणी हाेत असल्याने गर्दी वाढत हाेती. त्यामुळे नागरीक देखील गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत हाेते. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात टेस्टिंगला प्राधान्य दिले असून त्यासाठी टेस्टिंग सेंटर देखिल सुरू झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे गेल्या काही दिवसात काेराेना तपासणीचे प्रमाण वाढले तातडीने तपासणी हाेऊन बाधितांवर उपचार सुरू हाेणे तसेच रूग्णाचे विलगिकरण करणे शक्य व्हावे यासाठी अँटीजन टेस्टवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत शहरातील १२ ठिकाणी अँटीजन टेस्ट कॅम्प सुरु आहे.