लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत मनपाला १० कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत नगरविकास विभागाकडून मनपाला नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. विकासकामांमध्ये शक्यतो रस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.
नगरोत्थान योजनेअंतर्गत ५ कोटी, दलितेतर योजनेअंतर्गत ५ कोटी आणि अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी ५० लाख असा एकूण १० कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी १ कोटींची कामे आमदार सुरेश भोळे सुचवतील ते आणि १ कोटींची कामे महापौर सुचवतील ती करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभागासाठी ४० लाखांच्या निधीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.