अनधिकृत हॉकर्सवरही कारवाईचा बडगा ; गेल्या पाच दिवसात शहरातील २५ दुकाने सील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठ भागात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गोलाणी मार्केटमधील चार दुकाने सील केली आहेत.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान गोलाणी मार्केटमधील अनेक दुकानदारांनी लपून छपून आपले व्यवसाय सुरु ठेवले होते. मनपाचे पथक दाखल झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांकडून छायाचित्रण करीत असताना अनेक दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे मनपाच्या पथकाकडून अनेक दुकानदारांचा माल देखील जप्त करण्यात आला.
भाजीपाला विक्रेत्यांनी फुले मार्केटमध्ये थाटली दुकाने
सध्या अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळण्यास मदत हाेत आहे. मात्र, मंगळवारी मनपा कर्मचाऱ्यांना गुंगारा देत हाॅकर्सने फुले मार्केटमध्ये बाजार मांडल्याचे चित्र दिसून आले. दुकानदारांनी देखील चाेरी चाेरी चुपके चुपके दुकाने उघडून व्यवसायाची संधी साधल्याने गर्दी वाढली हाेती. फुले मार्केटमध्ये व्यवसायाला बंदी घातल्यामुळे हवालदिल झालेल्या हाॅकर्सने सुटीचे संधीत रूपांतर करत फुले मार्केटच्या प्रत्येक विंगमध्ये दुकान थाटले होते. त्यामुळे सकाळपासून फुले मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली हाेती. गेल्या काही दिवसापासून दुकाने उघडण्यासाठी आग्रही असलेल्या दुकानदारांनी पालिकेचे पथक नसल्याचा फायदा घेत अर्धे शटर उघडून व्यवसाय केला. ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊन बाहेरून कुलूप लावण्याचे प्रकार देखील फुले मार्केटमध्ये घडले.
सायंकाळी मनपाच्या पथकाकडून अनधिकृत हॉकर्सवर कारवाई
दुपारच्या वेळेस अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी फुले मार्केटमध्ये दुकाने थाटून व्यवसाय केला. तर सायंकाळी अनेक विक्रेत्यांनी बळीराम पेठ, सुभाष चौक या भागात देखील दुकाने लावली होती. याबाबत मनपाच्या पथकाला माहिती मिळताच मनपा पथकाकडून सरसकट २५ हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. तसेच अनेकांचा माल देखील यावेळी जप्त करण्यात आला. मनपाचे पथक आल्यानंतर बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला होता. अनेक विक्रेत्यांनी मिळेल त्या गल्लीमध्ये जाऊन आपला माल लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनपाच्या पथकाने गल्लोगल्ली जाऊन विक्रेत्यांचे सामान जप्त केले.