महापालिकेत खांदेपालट
जळगाव - प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी पुन्हा खांदेपालट केली आहे. मालमत्ताकर विभाग पुन्हा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. पूर्वी ही जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांच्याकडे हाेती. परंतु गायकवाड यांच्याकडे अमळनेर नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता प्रभाग समिती १ ते ४ मधील मालमत्ताकर विभागाची जबाबदारी पाटलांकडे साेपविण्यात आली आहे. तर भांडार विभाग हा अतिरिक्त आयुक्तांकडे तर क्रीडा विभाग उपायुक्त श्याम गाेसावी यांच्याकडे साेपविला आहे.
आगामी सात दिवस पावसाचे
जळगाव - मध्य प्रदेश व महाराष्ट्रालगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात आगामी सात दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच जिल्ह्यात आगामी काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून यामुळे तापमानातदेखील मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.