लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही, त्यात लसींचा पुरवठादेखील शहरात पूर्णपणे होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे यासाठी मनपा प्रशासनाने स्वखर्चाने लसींची खरेदी करावी, अशी मागणी महानगर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत गुरुवारी महानगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक धीरज सोनवणे, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले होते की, राज्यातील अनेक महानगरपालिकांकडून निविदा काढून लसींची खरेदी केली जात आहे. यासाठी महापालिकांनी स्वतंत्र बजेटची देखील व्यवस्था केली आहे. शहरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण वाढवण्याची गरज असून महापालिका प्रशासनाने लसींची खरेदी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे भाजपकडून करण्यात आली आहे.