लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी लॅबमध्ये कोविडची टेस्ट करणाऱ्या व बाधित आढळून येणाऱ्या वीस टक्के रुग्णांचे मोबाईल क्रमांक व पत्ते चुकीचे नोंदविल्याप्रकरणी शहरातील १९ खासगी लॅबला महापालिकेतर्फे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी नोटीस काढली आहे.
अनेक खासगी लॅबकडून आलेल्या माहितीवरून रुग्णाशी संपर्क साधल्यानंतर तो क्रमांक एकतर बंद येतो, किंवा चुकीचा असतो, अनेक वेळा पत्ते चुकलेले असतात, किमान वीस टक्के बाधितांच्या बाबतीत हा प्रकार घडत आहे. त्यामुळे रुग्ण सापडत नाही. यामुळे कोविडचा प्रादूर्भाव वाढण्याचा धोका असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरळीत होत नाही. या लॅब चालकांनी रुग्णांची माहिती अचूक पाठवावी, अशा सूचना या नोटीसद्वारे दिल्या आहेत.
ही माहिती पाठवावी
खासगी लॅबमध्ये रुग्णांनी तपासणी केल्यानंतर चाचणी केलेल्या रुग्णाचे संपूर्ण नाव, वय, लिंग, सविस्तर कायमस्वरूपी, सध्या रहिवास असलेला पत्ता जळगाव शहराच्या हद्दीतील आहे किंवा नाही याची सविस्तर नोंद, रुग्णाचा टेस्ट रिपोर्ट पाठविताना सध्या रहिवासाचा पूर्ण पत्ता पाठविणे आवश्यक आहे. संपर्कासाठी रुग्णाचा एक व नातेवाईकांचा एक असे दोन अचून मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. वरील माहिती अपूर्ण असल्याने व रुग्ण न सापडल्यास ही जबाबदारी संबधित पॅथॉलॉजी लॅबची राहिल, असा इशारा प्रमुख वैद्यकीय अधिकार डॉ. राम रावलानी यांनी दिला आहे.