बेसमेंट पार्किंगवर कारवाई करा
जळगाव - शहरातील अनेक मोठ्या दुकानदारांनी बेसमेंटचा व्यावसायीक वापर सुरु केला असून, यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यास अडचणी येत आहेत. मनपा प्रशासनाने याबाबत गांभिर्याने विचार करून, संबधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी केली असून, याबाबत त्यांनी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन दिले आहे.
सभापतींनीही दिले महापौरांना पत्र
जळगाव - भाजपच्या गटनेता बदलविण्यावरून भाजपचे निष्ठावान व बंडखोर नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दोन दिवसांपुर्वी बंडखोरांनी महापौरांना पत्र देत नवीन गटनेता व उपगटनेत्याची निवड केली आहे. या प्रक्रियेला भाजपचे उपगटनेता व स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी हरकत घेतली असून, बुधवारी त्यांनी महापौर जयश्री महाजन यांना पत्र देत परस्पर गटनेता बदलाचे पत्र देत बंडखोरांच्या गटनेत्याला मान्यता देऊ नये असे म्हटले आहे.
वकिलांच्या मार्फत मांडणार नगरसेवक बाजू
जळगाव - महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडीच्या निवडणुकीत भाजपचा व्हिप झुगारून मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना अपात्रतेबाबतच्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत. नगरसेवकांनी आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असून, आता बंडखोर नगरसेवकांकडून आपली बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडणार आहेत. यासाठी गुरुवारी नगरसेवकांनी बैठक घेवून चाचपणी देखील सुरु केली आहे. सोमवारपर्यंत नगरसेवक आपली बाजू विभागीय आयुक्तांकडे मांडणार आहेत.
कडगाव फाट्यावर बसथांबा द्या
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत जळगाव-भुसावळ रस्त्यावर असलेल्या कडगाव फाट्यावर बस थांबा देवून, त्याठिकाणी लहान स्थानक उभारण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव तालुका चिटणीस योगेश पाटील यांनी केली आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.