लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शहरात कडक बंदोबस्त लावले असतानादेखील शहरातील भाजीपाला विक्रेते व अनेक दुकानदार या नियमांचे सोयीस्कररीत्या उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी देखील शहरातील घाणेकर चौक, सुभाष चौक परिसरातील तब्बल ४० भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनेक विक्रेत्यांकडून माल देखील जप्त करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून भाजीपाला विक्रेत्यांना वेळोवेळी नियम, सूचना केल्या जात असताना देखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनपा प्रशासनाने शहरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी ९ जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र या जागांवर व्यवसाय करण्यास अजूनही अनेक विक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. शहरातील या निश्चित केलेल्या जागांवर ठराविकच विक्रेते भाजीपाला विक्री करताना आढळून येत आहेत. बुधवारी देखील शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात अनेक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. गुरुवारी देखील या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटून बाजारच भरला होता. उपायुक्त संतोष वाहुळे पथकाकडून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार कारवाईची मोहीम राबवण्यात आली. अनेक विक्रेत्यांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे. काही वाद निर्माण होऊ नये म्हणून शनिपेठ व शहर पोलीस स्टेशन मधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील या पथकामध्ये समावेश होता.
बसस्थानकासमोरील चहाच्या टपऱ्यांवर केली कारवाई
शहरातील बस स्थानका समोर देखील अनेक पदार्थ विक्रेते व चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिकेचा पथकाकडून जोरदार कारवाई करत चार हात गाड्या जप्त केल्या आहेत. भजे गल्ली परिसरात देखील अनेक पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह गणेश कॉलनी चौक परिसरातील काही भाजीपाला विक्रेत्यांवर देखील सकाळी कारवाई करण्यात आली.
मोहीम अधिक तीव्र करणार - संतोष वाहुळे
जिल्हा व मनपा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी शहरात वाढत जाणारा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही शहरातील अनेक दुकानदार आपले दुकाने लपून-छपून उघडे ठेवून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. भाजीपाला विक्रेत्यांना वेळोवेळी आवाहन करून देखील भाजीपाला विक्रेते शिस्तीत व्यवसाय करायला तयार नाहीत, यामुळे आता शुक्रवारपासून नियम मोडणारा विरोधात अधिक तीव्रतेने कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी लोकमतला दिली. तसेच जप्त करण्यात आलेला माल देखील विक्रेत्यांना परत दिला जाणार नाही असाही इशारा उपायुक्तांनी दिला आहे.