जळगाव : गुन्हेगारांना शिक्षा झाली तरच गुन्ह्यांना आळा बसतो व कायद्याचा धाक हा कायम असतो. मात्र न्यायदानाचे काम करीत असताना निर्दोष व्यक्तीलाही शिक्षा व्हायला नको याचीही तितकीच खबरदारी घेतली जाते. जिल्हा सत्र न्यायालयाने जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या गुन्ह्यात ३२ गन्हेगारांना शिक्षा सुनावली, त्यात सर्वाधिक खुनाच्या घटनेत १७ तर बलात्काराच्या घटनेत १० अशा २७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वर्षभरात १४२ प्रकरणे न्यायालयाच्या समोर सुनावणीसाठी आली, त्यात ११० जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
सन २०१८ या वर्षात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे शिक्षेचे प्रमाण ७ टक्के होते, यंदा यात वाढ झाली असून हे प्रमाण २२.५४ टक्क्यांवर आले आहे. जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात राहुल प्रल्हाद सकट (२५) या तरुणाच्या खून प्रकरणात ७ नोव्हेंबर रोजी एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. जळगावप्रमाणेच भुसावळ व अमळनेर सत्र न्यायालयातही शिक्षेचे प्रमाण यंदा वाढले आहे.
बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तीन जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. बालकांचे लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालय अतिशय गंभीर असल्याचे शिक्षेच्या प्रकरणांवरून दिसून येते. गेल्या वर्षात शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचीही संख्या तितकीच वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात जिल्ह्यात ५३ खून झाले तर बलात्काराची ८१ प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल झाली. विनयभंगाच्याही २८८ घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
अशा आहेत प्रमुख गुन्ह्यातील शिक्षा
गुन्ह्याचा प्रकार शिक्षा झालेल्या आरोपींची संख्या
खून : १७
बलात्कार : १०
लाच प्रकरण : ०४
विनयभंग : ०२
ॲट्राॅसिटी : ०६
कोट...
गेल्या वर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असली तरी दोन वर्षाच्या तुलनेत १५ टक्के शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. त्याचे समाधान आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक असलाच पाहिजे. त्यासाठी यंदाही जास्तीत जास्त खटले निकाली काढून शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न आहेत.
-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील