जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून कोरोनामुळे पॅरोलवर आलेल्या बापू संतोष राजपूत (वय ४४, रा. हिराशिवा कॉलनी) याने पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात नुकताच जामिनावर सुटलेल्या डेम्या ऊर्फ महेश वासुदेव पाटील (वय २१, रा. हिराशिवा कॉलनी) याचा चॉपरने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या समोरच पाण्याच्या टाकीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीजवळ बापू राजपूत व काही जण दारू पीत असताना डेम्या तेथे आला. बापू याच्यावर मागून चॉपरने हल्ला केला, मात्र त्याने तो वार चुकविला, त्यामुळे तो हाताला लागला. नंतर बापू यानेही त्याच्याजवळील चॉपरने डेम्याच्या गळ्यावर, हातावर व पोटात चॉपर खुपसला. स्वत:ला वाचविण्यासाठी डेम्या पळत सुटला. टाकीच्या कंपाऊडच्या बाहेर गवतात तो गतप्राण झाला. या घटनेनंतर बापू स्वत:च चारचाकीने जिल्हा रुग्णालयात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे व सहकाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचेही पथक यावेळी घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर बापूला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातही दोन गट भिडले
बापू याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नेत्र कक्षाच्या बाहेर दोन गटात हाणामारी झाली. तेव्हा एकही पोलीस तेथे पोहोचलेला नव्हता. थोड्या वेळाने पोलीस आल्यानंतर दोन्ही गटाने पलायन केले. जिल्हा रुग्णालय व घटनास्थळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पंधरा दिवसांपूर्वीच होणार होता बापूचा गेम
गेल्या महिन्यात २५ जून रोजी पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिराजवळ डेम्या याला गावठी पिस्तूलसह पकडण्यात आले होते. या गुन्ह्यात तो नुकताच जामिनावर सुटला होता. डेम्याने हे पिस्तूल बापूचा गेम करण्यासाठीच आणले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. मात्र तो पकडला गेल्याने संभाव्य घटना टळली होती.
बापूकडून तिसरा खून; एकात निर्दोष
बापू याच्यावर यापूर्वी दोन खुनांचा आरोप आहे. पाळधी येथे प्रशांत पाटील (रा.पिंप्राळा) याचा खून झाला होता. त्या गुन्ह्यात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कोरोनामुळे वर्षभरापासून तो पॅरोलवर होता. गुजराल पेट्रोल पंपाजवळ ट्रॅव्हल्स बसच्या क्लीनरचा खून केल्याचाही आरोप बापूवर होता, मात्र न्यायालयाने त्याला यात निर्दोष मुक्त केले होते. आता डेम्याचा हा खून तिसरा आहे. डेम्या याच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.