जळगाव/ नशिराबाद : तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (४१) या इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. दरम्यान, मृतावर अंत्यसंस्कार होण्याआधीच पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल देविदास मराठे(२२) राहूल नरेंद्र जाधव (१९) व गोपाळ दिलीप भुसारी (२२ सर्व रा.कंडारी, ता.जळगाव) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे,सचिन कापडणीस व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पथकामार्फत गावात चौकशीसत्र राबविण्यात आले. दुपारी बारा वाजेपर्यंत धागेदोरे मिळून तीन वाजता संशयितांना अटक करण्यात आली. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर कंडारी येथे तुषार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शाळेत केले मद्य प्राशनसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार सुर्वे यांच्याशी राहूल व विशाल या दोघांचा जुना वाद होता. या वादाला प्रेमसंबंधाची किनार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बुधवारी रात्री अटकेतील तीनही तरुणांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत मद्य प्राशन केले, त्यानंतर खळ्यात जाऊन विशाल व गोपाळ यांना तुषारशी बोलण्यात गुंतवून ठेवत राहुल याने तुषारच्या डोक्यात दगड टाकला. तीन ते चार वेळा दगड टाकल्याने तुषार जागीच गतप्राण झाला.
कंडारीत दगडाने ठेचून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:12 PM