जळगाव : चारित्र्यावर संशय घेत मद्याच्या नशेत डोक्यात कुऱ्हाड टाकून आईचा खून करणाऱ्या समाधान वाल्मिक शेवाळे (रा.चाळीसगाव) याला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी धरुन ९ वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, त्याशिवाय बहिणी व मेहुणा असे जवळचे नातेवाईक फितूर झाले होते, तरी देखील आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या.एस.जी.ठुबे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
चाळीसगावातील शिंगळे मळा भागात १० जून २०१९ रोजी पद्माबाई वाल्मिक शेवाळे व त्यांचा मुलगा समाधान असे दोघंच घरी होते. वाल्मिक शेवाळे मुलीकडे गेले होते. समाधान याला दारुचे व्यसन होते. त्या दिवशी रात्री दारुच्या नशेतच आईच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून खून केला होता. घर मालक शंकर पंडीत शिंगटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासात हा खून मुलगा समाधान यानेच केल्याचे उघड झाले. गुन्हा करताना वापरलेले कपडे त्याने काढून दिले होते तसेच घरातून कुऱ्हाड जप्त करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुन्हा दाखल झाला होता.
१९ साक्षीदारांची तपासणीन्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात खटला चालला. सहायक शासकीय अभियोक्ता सुरेंद्र जी काबरा यांनी १९ साक्षीदार तपासले. त्यातील आरोपीची बहिण व मेहुणा हे फितूर झाले. गुन्हा केल्यानंतर समाधान याने ज्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती, तेव्हा त्यांच्याकडे त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याबाबत न्यायालयात आलेला पुरावा व कपड्यावरील रक्ताचे डाग या महत्वपूर्ण पुराव्याच्या आधारावर समाधानविरुध्द कलम ३०४ (२) गुन्हा शाबीत झाला. राजेंद्र किसनराव देशमुख, शंकर पंडीत शिंगटे, सागर उत्तमराव बैरागी, तौफिक शेख इस्माईल, दिलीप कुमावत, डॉ.पी.बी.बाविस्कर, तपासाधिकारी एस.एस.पाटील यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी व केस वॉच दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.