लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या जिनिंग कामगाराचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत जिनिंगच्याच पाठीमागे असलेल्या शेतात शनिवार, २० एप्रिल रोजी दुपारी आढळून आला. सुरेश पमरसिंग सोलंकी (२६, रा. सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु. लक्ष्मी जिनिंगजवळ, कानळदा रोड) असे मयताचे नाव आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय असून या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकिची कापूस जिनिंग आहे. या ठिकाणी मध्यप्रदेशातील काही कामगार कामाला आहे. त्यातील सुरेश सोलंकी हा कामगार शुक्रवार, १९ एप्रिलपासून बेपत्ता होता. शनिवारी सकाळीदेखील तो न दिसल्याने ठेकादार मनोज सोनवणे हे त्याचा शोध घेत होते. त्या वेळी जिनिंगच्या मागील बाजूल असलेल्या भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लास्टिकवर सुरेशचा मृतदेह आढळून आला. या विषयी तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व सहकारी घटनास्थळी पोहचले.
घटनास्थळी मंगळसूत्र, पैंजणघटनास्थळावर पोलिसांना मृतदेह पालथा पडलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाच्या काही अंतरावर मंगळसूत्र, दोन पैंजण व २० रुपयांचा शिक्का आढळून आला. तसेच मयताच्या डोक्याच्या मागील बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याचा घाव दिसून आला. त्यामुळे या तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. हा खून शुक्रवारी रात्रीच झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली आहे.
श्वानाने काही अंतरापर्यंत काढला मागघटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकही दाखल झाले होते. घटनास्थळापासून श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. पोलिसांनी जिनिंग परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आल्याने पोलिसांनी परिसरातील घरांचीही पाहणी केली.
दोन महिन्यांपूर्वीच कामावरसुरेश सोलंकी हा मूळ मध्यप्रदेशातील असून दोन महिन्यांपूर्वीच तो येथे कामाला आला होता. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेविषयी त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.