जामनेर : येथील भुसावळ रस्त्यावरील नियोजीत औद्योगीक वसाहतीत सुमारे २५ वर्ष वयाच्या अज्ञात तरुणाचा दगड, विटांनी ठेचुन खुन केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.या मन सुन्न करणाऱ्या घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरा भागातील नागरीक दररोज या रस्त्याने सायंकाळी फिरायला जातात. त्यांना जामनेर भुसावळ रस्त्यापासुन २५ ते ३० फुट अंतरावर तरुणाचा मृतदेह दिसुन आल्याने त्यांनी पोलिसांना कळवीले.ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी तरुणाच्या मृतदेहा जवळ चष्म्याचे फुटलेले काच दिसले. याचबरोबर मोबाइल तसेच सीम कार्ड व बॅटरी विखरलेले दिसुन आले.ही खुनाची घटना पाच ते साडेपाचचे सुमारास घडली असावी असा कयास आहे. या ठिकाणी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी क्रुझर वाहन थांबल्याचे काहींनी पाहिल्याचे समजले.घटनास्थळी पोलिसांकडुन रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाहणी सुरु होती. घटनेची माहिती समजताच नागरीकांनी गर्दी केली. यावेळी मोबाईलच्या उजेडात अनेकांनी मृतदेह पाहिला. दरम्यान या घटनेमागील कारण काय असावे? हा युवक कोण असावा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलीस याचा तपास करीत आहेत.