मुक्ताईनगर, जि.जळगाव : तीन महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेशात खून झालेला मात्र आज जिवंत असलेला इसम मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे सापडला असून, शहापूर व मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे मात्र तीन महिन्यांपासून त्याच्या खुनाच्या आरोपात असलेले तीन व्यक्ती मात्र कोठडी भोगत आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेपानगर (मध्य प्रदेश) तालुक्यातील नावरा पोलीस स्टेशन हद्दीत तीन महिन्यांपूर्वी शेख रफीक शेख नाथू या इसमाचा खून झाल्याचा गुन्हा माहिती रफिक याची पत्नी यांनी दाखल केलेला होता. त्याचे प्रेत आढळून आलेले नव्हते. दरम्यान, संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली होतीे व तिघे सध्या करागृहात आहेत.शेख रफीक हा नयन खेडा, ता.नेपानगर, जि.खंडबा या गावचा रहिवासी असून, तीन महिन्यांपूर्वी त्याचा खून झाल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने नावरा पोलीस स्टेशनला दिलेली होती. त्या आरोपावरून तीन लोकांना अटक करण्यात आलेली होती. मात्र हा इसम मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आपल्या एका नातेवाईकाच्या घरी असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. कोथळीचे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी सतर्कतेने माहिती काढली असता या नावाचा व्यक्ती येथे राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. यावरून मुक्ताईनगर व शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रफिक यास ९ रोजी सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. त्यानंतर शहापूर पोलिसांनी त्याचा ताबा मिळवत त्याला मध्य प्रदेशात नेले आहे. जिवंत सापडल्याने एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तीन आरोपी मात्र कारागृहात खितपत पडले असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, सदर इसमास नेपानगर न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर तिघांची सुटका होईल, असेही शहापूर पोलिसांनी सांगितले.
खून झालेला इसम कोथळी गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:38 AM