लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची एकप्रकारे संगीतखुर्ची आणि खुर्चीचे राजकारण पाहावयास मिळाले. एकदा जागा सोडली म्हणजे पदाधिकाऱ्यांना जागा मिळत नव्हती, तर जयंत पाटील यांच्या शेजारी जागा खाली होताच पदाधिकारी ही संधी साधून तातडीने त्यांच्या शेजारी बसायला जात होते. पूर्ण कार्यक्रम हा खुर्चीचा खेळ सुरू होता.
सुरूवात झाली ती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान यांच्या भाषणानंतर. ते ज्या जागी आधी बसलेले होते, त्या जागी माजी आमदार दिलीप सोनवणे बसले, खान परतल्यानंतर या ठिकाणी आपण बसलो होतो, असे त्यांनी सांगून देखील दिलीप सोनवणे उठले नाही, शेजारच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले मात्र, तरीही ते बाजुला झाले नाही. नंतर ते संतोष चौधरी यांच्या शेजारी जाऊन बसले मात्र, तेथे बसता येत नसल्याने स्वतंत्र खुर्ची मागवून अखेर दिलीप सोनवणे यांच्या समोर खुर्ची टाकून ते बसले.
किस्सा खुर्ची का
जयंत पाटील यांच्या शेजारी सर्वात आधी ॲड. रवींद्र पाटील बसले होते. ते भाषणाला उठताच माजी आमदार संतोष चौधरी तेथे आले. त्यानंतर अभिषेक पाटील बसले, असे टप्प्याटप्प्याने पदाधिकारी जयंत पाटील यांच्या शेजारी बसत होते. भाषण आटोपून रवींद्र पाटील यांना दुसऱ्याच जागेवर बसावे लागले.