जळगाव : केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशभरातील रसिकांना आपल्या स्त्री भूमिकेने भूरळ घालणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा प्राथमिक शिक्षणासह संगीताचा पाया रचला गेला तो जळगावातील बळीरामपेठेत, असे कोणी सांगितले तर त्यावर राज्यातील नाट्य रसिकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य असून शहरासाठी भूषणावह बाब असलेल्या या क्षणांचे साक्षीदार आहेत ते म्हाळस कुटुंबीय. बालगंधर्व यांचे मामा आबाजी राघो म्हाळस यांनीच बालगंधर्व यांना जळगावात आणले व त्यांना येथे शिकविले. त्याबद्दलच्या आठवणी आजही घरात ताज्या असल्याची माहिती आबाजी म्हाळस यांचे पणतू हेमंत म्हाळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचे जळगावशी असलेले नाते, ऋणानुबंध यांचा आढावा घेतला असता त्यांच्या अनेक आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे जळगावात असलेले वास्तव्य व त्यांनी येथे गिरविलेले शालेय शिक्षण व संगीताचे धडे.संगीताचे बाळकडू शनिपेठेतूनजळगावात इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेत असतानाच वयाच्या आठव्या वर्षापासूनच बालगंधर्व यांनी संगीताचे धडे घेतले. यासाठी त्यांनी शनिपेठेतील रहिवासी महेबूब खाँ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. येथे रचल्या गेलेल्या या पायावरच पुढे बालगंधर्व यांनी पुणे गाठले व तेथे संगीत, नाट्य क्षेत्रात आपल्या अभिनयाला सुरुवात केली. मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटविणाºया या महान कलावंताच्या कलेचा पाया जळगावात रचला गेला व ते आमच्या कुटुंबात राहिले हीच मोठी भूषणावह बाब आहे, असे हेमंत म्हाळस म्हणाले.बालगंधर्वांची मौंजही जळगावातबालपणीच बालगंधर्व यांना जळगावात आणल्याने त्यांची मौंजदेखील त्यांच्या मूळगावी न होता त्यांच्या मामांनी ती जळगावातच केली. त्यामुळे जीवनातील महत्त्वाच्या या विधीसह प्राथमिक शिक्षण,संगीताची सुरुवात जळगावातूनहोणे हा शहरासाठी मोठा ठेवा मानला जातो.मामांकडे वास्तव्यबालगंधर्व बराच काळ बळीराम पेठेतील आपले मामा आबाजी राघो म्हाळस यांच्याकडे होते. त्यांच्या आठवणी आजही म्हाळस कुटुंबिय सांगतात. १९२९ साली बालगंधर्व यांनी त्यांचे मामेभाऊ डॉ. सदाशिवराव म्हाळस यांना लिहिलेले पत्र आजही म्हाळस कुटुंबियांनी जपून ठेवले आहे. या पत्रात आबाजींच्या नावाने जळगावात संगीत भवन उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. यासह विविध छायाचित्रेही या कुटुंबियांकडे आहेत.
बालगंधर्वांनी गिरविले जळगावातून संगीताचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:02 PM