राज्यभरातील अतिसंवेदनशील शहर म्हणून ६४ दंगलींचे शहर म्हणून रावेर शहराचा डंका आहे. ही पार्श्वभूमी पाहता प्रत्येक सण-उत्सवापूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या शांतता समितीच्या बैठकी होतात, मात्र उपयोग होत नसल्याबाबत बैठकीत लक्ष वेधले होते.
रविवारी आल्याने राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कृषक समाज गणेश मंडळाची गणरायाची मंगलमूर्ती ही मन्यारवाडा मशिदीसमोरून मंगरूळ धरणात विसर्जन करण्यासाठी जात होती. तथापि, मशिदीचे विश्वस्त तथा प्रतिष्ठित मौलाना शेख रफीक शेख मोहंमद, शफीखान मोहंमद, शेख मुस्तफा शेख यासीन, हाजी अख्तर मौलाना, मोहंमद अकबर शेख, मोहंमद अकबर शेख खलील शेख, मुस्तफा हुसेन शेख, इम्तियाज शेख, हाजी गुलाम शेख, खलील शेख, मुस्तफा हुसेन शेख, शफीउद्दीन शेख यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कृषक समाज गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी जात असलेल्या विघ्नहर्त्यावर जणूकाही ‘दंगलींचे विघ्न टळू दे...’ म्हणत पुष्पवृष्टी करून पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोपही दिला.
मंडळाचे कार्यकर्ते ॲड. लक्ष्मीकांत शिंदे, राजेश शिंदे, प्रशांत दाणी, भाऊलाल महाजन, अनिल महाजन, नगरसेवक सुधीर पाटील, गोपाळ शिंदे व श्याम शिंदे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याचवेळी मन्यारवाडा मशिदीच्या संबंधित विश्वस्तांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, पोलीस निरीक्षक कैलास नागरे व सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांचेही स्वागत केले. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे एक पाऊल पुढे पडत असल्याचे पाहून पोलीस उपअधीक्षक विवेककुमार लावंड यांनी मन्यारवाडा मशिदीचे विश्वस्त व कृषक समाज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सहृद्य सत्कार केला. यावेळी गोपनीय विभागाचे सहायक फौजदार राजेंद्र करोडपती, पोकॉ पुरुषोत्तम पाटील, गुन्हे लेखनिक पो ना. बिजू जावरे, पोकॉ सचिन घुगे, सुकेश तडवी आदी उपस्थित होते.
चौकट
पोलिसांच्या एमपीडीएच्या
कारवाईला रावेरकरांचे चोख उत्तर
रावेर शहरातील मन्यारवाडा प्रार्थनास्थळासमोर जनता कर्फ्यूच्या दिवशी उसळलेल्या हिंसक दंगलीत वाहनांची जाळपोळ करून एकाची निर्घृण हत्या झाल्याने रावेर पोलिसांनी काही आरोपीतांवर एमपीडीएची कठोर कारवाई केली होती. त्या कारवाईला उच्च न्यायालयाने रद्दबातल केली असली तरी त्यास वर्षपूर्ती होत असतानाच रावेर शहरातील दोन्ही गटांनी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या मंगलमूर्तींवर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण निरोप दिला व नवा आदर्श निर्माण केला आहे.
विघ्नहर्त्यावर पुष्पवृष्टी करणाऱ्या मुस्लीम विश्वस्त मंडळ व गणेश मंडळ पदाधिकारी यांचा सत्कार करताना विवेक लावंड, कैलास नागरे, शीतलकुमार नाईक. (छाया : किरण चौधरी)