- डमी
वर्षभरापासून लेकीला लागली माहेरची आस : कोरोनामुळे मामाचे गावही हरविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे. तर अनेक जण लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून एकमेकांना भेटू शकलेले नाहीत. आखाजी म्हटली म्हणजे लेकींना माहेरची आस लागते; मात्र वर्षभरापासून कोरोनामुळे माहेरी जाता आले नसून, माय-लेकींची भेट होऊ शकलेली नाही. सासरी नांदणाऱ्या लेकी आणि लेकींची वाट पाहणारी माऊली हिरमुसून गेल्या आहेत.
माझं माहेर
दरवर्षी आखाजीला माहेरी जाण्याची आस लागलेली असते; मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माहेरी जाणे शक्य होत नाही. माझे माहेर चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आहे. सासर जरी जळगाव तालुक्यातील असले तरी पुणे येथे वास्तव्य असल्याने माहेर व सासरी देखील जाता आलेले नाही. परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती; मात्र ती अजून भयंकर होत असल्याने, माहेरच्या मायची भेटीची प्रतीक्षा लांबतच जात आहे.
-प्रियंका प्रशांत पाटील,
फेब्रुवारी २०२० मध्ये एका लग्नानिमित्त जळगाव तालुक्यातील गाढोदे येथे माझ्या माहेरी जाऊन आले होते; मात्र त्यानंतर महिनाभरातच कोरोना आल्याने वर्षभरापासून माहेरी जाता आलेले नाही. वर्षभरात अनेक सुख,दुःख आली मात्र मी सहभागी होऊ शकली नाही.
-कविता गोपाल जाधव,
वर्षभरापासून घरातच सर्व जीवन सुरू असल्याचे वाटत आहे. केव्हा कोरोना पासून सुटका मिळेल व परिस्थिती पुन्हा सुधारेल याची वाट पाहत आहे. माहेरी जाण्याची अशी ओढ कधीच नव्हती जितकी आता वाटत आहे. विशेष म्हणजे आखाजीचे माहेरमधील जुने दिवसच आठवण करूनच आनंदित राहण्याचा प्रयत्न करत आहे.
- भावना शिवराज पाटील,
लागली लेकीची ओढ
आखाजी असो वा दिवाळी एका आईसाठी आपली लेक माहेर आल्याचा आनंद सर्वोच्च असतो; मात्र हा आनंद वर्षभरापासून माझ्यापासून दूरच आहे. माझ्या दोन्हीही लेकी आखाजीला गावी येऊ शकल्या नाहीत. इच्छा खूप असते मात्र परिस्थिती कठीण असल्याने घरीच राहणे महत्त्वाचे आहे.
-सिंधू शिवाजी पाटील
एक मुलगी चाळीसगावला असल्याने तिची भेट होऊ शकली, मात्र एक मुलगी उज्जैनला राहत असल्याने तिची भेट होऊ शकलेली नाही. वर्षभरात काही आनंदाचे क्षण अनुभवले मात्र या क्षणात लहान मुलीची कमतरता आम्हाला जाणवली. कोरोनाची परिस्थिती दूर झाल्यानंतर लेकीची भेट होईल. नातवंडांची भेटीची ओढ कायम आहे.
- यामिनी दुबे
आधुनिक काळात असल्याने मोबाईलवरून व्हिडिओ कॉलिंगद्वारे मुलीशी बोलणं होतं;मात्र तिला प्रत्यक्षात पाहून जो आनंद मिळतो तो आनंद गेल्या वर्षभरापासून मिळू शकलेला नाही.
- मंगला सुरेश चौधरी
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार
वर्षभरापासून शाळेला सुट्टी आहे;मात्र घरातच थांबावे लागत आहे. सुट्टीनंतर मामाच्या गावाला जाता येईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनामुळे मामाच्या गावाला जाता आलेले नाही. आखाजी, दिवाळी सर्वच सण घरात साजरे करावे लागत आहेत.
- ओम पाटील,
उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावी गेल्यावरच खऱ्या अर्थाने आनंदात जात असते; मात्र हा आनंद गेल्या वर्षभरापासून मिळू शकलेला नाही. घरातच राहून सर्व प्रकारच्या आनंदावर विरजण टाकावे लागत आहे.
-अक्षित पाटील
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला मामाच्या गावाला जायला खूप मजा येते. उन्हाळ्यात आणि दिवाळीत सुटी लागली की मला त्यांच्याकडे जावे वाटते. कारण तिथे माझी इतर भावंडे भेटतात, मित्र भेटतात. पण कोरोना आला आणि आमचे गावी जाणे थांबले.
- संचित चव्हाण