जळगाव - असोदा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गतजिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व सार्वजनिक विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून वसुंधरा मातेला जैवविविधतेने वैभव संपन्न करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप, पंचायत समितीच्या कक्षअधिकारी अबेदा तडवी, विजय लुल्हे, नंदलाल बाविस्कर आदी उपस्थित होते.
कोरोना लसीकरणाचे तिसरे केंद्र कार्यान्वित
जळगाव - शहरात नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी दोन खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. जळगाव शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम सुरू आहे. शहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटल, गाजरे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सोमवारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तिसरे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.सोनल कुलकर्णी, ऑर्किड हॉस्पिटलचे डॉ.परेश दोशी, डॉ.प्रीती दोशी, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पवन गोंधळीकर, डॉ.उदयसिंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भाजयुमो तर्फे आत्मनिर्भर भारत शिबीर
जळगाव - भाजयुमो तर्फे सोमवारी शहरातील शिवाजीनगर भागात आत्मनिर्भर भारत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या शेती पुरक व्यवसायाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा महानगर संयोजक महेश राठी, जयंत चव्हाण, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, राजू मराठे आदी उपस्थित होते.
त्या नाल्याचा कामाला अखेर सुरुवात
जळगाव - शहरातील एसएमआटी ते बजरंग बोगद्या दरम्यान असलेल्या नाल्याचा कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ३०० मीटर नाल्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र, दोन वर्षात देखील पुर्ण झालेले नाही. ‘लोकमत’ ने याबाबत वृत्त प्रकाशीत केल्यानंतर मनपाने मक्तेदाराला तातडीने काम सुरु करण्याचा सूचना केल्या होत्या. अखेर शनिवारपासून या कामाला सुरुवात झाली आहे.