लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडनंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण काही प्रमाणात समोर येत असताना पावसाळ्यात, दमट वातावरणात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत ज्यांना कोविड होऊन गेला आहे, ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. विशेषत: घरात बुरशी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाभरात म्युकरमायकोसिसच्या ७३ रुग्णांची शासकीय पातळीवर नोंद करण्यात आली. यातील २८ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. यातील एका महिलेच्या मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्याची शंका असल्याने त्या दृष्टीने डॉक्टरांनी तपासणी सुरू केली आहे. अशातच आता पावसाला सुरुवात झाली असून अशा स्थितीत हे रुग्ण वाढण्याची शक्यता अधिक वर्तविण्यात आली आहे.
५० नमुने पूर्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत बुरशीजन्य आजाराचे निदान केले जात असून डॉ. किशोर इंगोले हे मायक्रोस्कोपद्वारा या तपासणी करीत आहेत. या आजाराच्या ५० नमुन्यांची आजपर्यंत या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे. येथून निदान झाल्यानंतरच शस्त्रक्रिया किंवा औषधोपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेत असतात.
हे महत्त्वाचे
- बुरशीला दमट वातावरण पोषक असते.
- त्यामुळे तिचा संसर्ग होण्याचे प्रमाण या काळात वाढेल.
- प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांना लवकर लागण होण्याची शक्यता
- घरात ओलाव्यावर होणाऱ्या बुरशीपासूनही संसर्गाचा धोका
- घरात हवा खेळती असल्यास बुरशी वाढणार नाही
- कोविड झालेल्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक
कोट
दमट वातावरणात बुरशी वाढते व अधिक काळ टिकते. अशा वातावरणात शक्यतोवर स्वयंपाकघरात ओलावा निर्माण होऊन त्या ठिकाणी ही बुरशी वाढते. घरात एखादी व्यक्ती कोविडमधून बरी झाल्यानंतर या बुरशीच्या संपर्कात आल्यास त्यांना त्याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत घरात स्वच्छता ठेवावी. बुरशी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - डॉ. किशोर इंगोले, विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग
कोट
दमट वातावरणात बुरशीला खत-पाणी मिळत असल्याने ती अधिक काळ टिकते. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे, अशांना तिचा लवकर संसर्ग होऊ शकतो. अशा स्थितीत घरात शक्यतोवर हवा खेळती हवी. बंद घरात धोका अधिक असू शकतो. प्रतिकारक्षमता चांगली ठेवणे हे अशा स्थितीत महत्त्वाचे आहे.
- डॉ. निलेश चांडक, कर्करोगतज्ज्ञ