सुनील पाटील
जळगाव : भादली बुद्रूक येथील हॉटेल कारागीर प्रदीप सुरेश भोळे, त्यांची पत्नी संगीता भोळे, मुलगी दिव्या व मुलगा चेतन अशा चौघांच्या हत्याकांडाला येत्या २० मार्च रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र अद्यापही हा गुन्हा पोलीस रेकॉर्डला अनडिटेक्टच आहे. या घटनेचे गूढ अद्यापही कायम आहे. या गुन्ह्यात १४ महिन्यानंतर दोन जणांना अटक झाली होती, मात्र त्यांच्याकडूनही काहीच निष्पन्न झाले नाही. दोषारोपपत्र दाखल नसल्याने न्यायालयाकडून अटकेतील दोघांना तीन महिन्यातच जामीन मंजूर झाला.
तालुक्यातील भादली बुद्रूक येथे २० मार्च २०१७ रोजी हॉटेल कारागीर प्रदीप सुरेश भोळे व त्यांच्या कुटुंबीयांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेचे गूढ उकलण्यासाठी सहा आयपीएस अधिकारी, शेकडोच्या संख्येने अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. अडीच हजाराच्यावर लोकांचे कॉल डिटेल्स घेण्यात आले होते, तर २५० जणांची चौकशी करून काही धागेदोरे मिळतात का? याची चाचपणी करण्यात आली होती, मात्र अद्यापपर्यंत काहीच हाती लागले नाही. शेती व पैशांचा वाद तसेच अनैतिक संबंध याचीही पडताळणी करण्यात आली होती. गुन्हा घडल्याच्या १४ महिन्यांनंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक धारबळे यांनी बाळू उर्फ प्रदीप भरत खडसे व रमेश बाबुराव भोळे ( रा.भादली बुद्रूक, ता.जळगाव) या दोघांना अटक केली होती. पोलीस कोठडीत त्यांच्याकडून फारशी माहितीच मिळाली नाही.
नार्को चाचणीला नकार
तपासात बाळू व रमेश यांच्यावर संशय आल्याने दोघांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत चौकशीत तफावत आढळून आल्याने पोलिसांनी दोघांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गांधीनगर (गुजरात) येथील प्रयोगशाळेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यांच्याकडून नार्कोसाठी तारीखही मिळाली होती. तपासात दोघांनी तयारी दाखविली होती, मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला त्यांनी नकार दिला. त्यामुळे ही चाचणी होऊ शकली नव्हती, अशी माहिती आर.टी. धारबळे यांनी दिली. परिणामी तीन महिन्यानंतर दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. आजही हा गुन्हा कोणी केला, त्याचे कारण काय हे पोलीस दप्तरी अनुत्तरीतच आहे.
या आयपीएस अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, पण...
ही घटना घडली तेव्हा डॉ.जालिंदर सुपेकर पोलीस अधीक्षक होते तर मोक्षदा पाटील या अपर पोलीस अधीक्षक होत्या. भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. त्याच काळात परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मनीष कलवानिया यांनीही या गुन्ह्याचा तपास केला. डॉ.सुपेकर यांच्या बदलीनंतर आलेले पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी देखील तपासात झोकून दिले. या सहा आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक डीवाय.एसपी, निरीक्षक व सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. नंतर हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तत्कालीन निरीक्षक सुनील कुराडे यांनी दोन महिने तपास केला. त्यांच्या बदलीनंतर या गुन्ह्याचा एक कागदही पुढे सरकलेला नाही. हा गुन्हा तपासावर असल्याने दोषारोपपत्र दाखल केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही संशयितांना गुन्ह्यातून वगळण्याच्या हालचाली
या गुन्ह्यात अटक केलेल्या बाळू व रमेश या दोघांकडून तपासात काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना गुन्ह्यातून वगळण्यासाठी १६९ अन्वये न्यायालयात प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, मात्र अद्याप तरी हे प्रकरण जैसे थे आहे. दरम्यान, याच गुन्ह्यात एका महिलने न्यायालयात १६४ अन्वये या दोघांविरुध्द जबाब दिल्याचेही सांगितले जात आहे.
दृष्टिक्षेपात भादली हत्याकांड
२० मार्च २०१७ : घटना उघड
२५० : जणांची चौकशी
९० : जणांचे जबाब
०६ : जणांची पॉलिग्राम चाचणी
१४ : जणांची ब्रेन फ्रिंगर प्रिंटिंग
२००० : जणांचे कॉल डिटेल्स काढले
०६ : आयपीएस अधिकाऱ्यांनी केला तपास