दरोडा, सावखेडा शिवारातील त्या खुनाचे गूढ कायम
पोलिसांना आव्हान कायम : सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या
जळगाव : शहरात दरोडा, घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत. शहरातील पिंटू इटकरे व पोलीस कर्मचारी यांच्याकडे झालेला दरोडा आणि सावखेडा शिवारात झालेल्या अनोळखी व्यक्तीचा खून पोलीस दप्तरी अद्यापही अनडिटेक्टच आहे. या घटनांमध्ये शंका, कुशंका अनेक आहेत पण तो गुन्हा जनतेसमोर अजून उघड झालेला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच सिंधी काॅलनीत प्रकाश साहित्या यांच्याकडे झालेला दरोडाही पोलिसांसाठी आव्हान ठरला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, दरोडा या घटनांनी डोके वर काढले असून पंधरा दिवसांपासून घडत असलेल्या घटना चक्रावून टाकणाऱ्या आहेत. सलग घटना घडत असताना एकही घटना उघडकीस येत नाही? त्यामुळे चोरटे व दरोडेखोरांनी पोलीस यंत्रणेला खुले आव्हान दिले आहे. सोनसाखळी चोरीची टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे, पण त्यानंतरही या घटना सुरूच आहेत. चोरटे व दरोडेखोरांचा शोध लागत नसता घटनाही रोखणे पोलिसांना शक्य नाही. दौलत नगरात ३ फेब्रुवारी रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात २१ लाखांचा दरोडेखोरांनी लांबविला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी तर पोलिसाच्याच घरात दरोडा पडला. त्यांच्या वृध्द आई, वडिलांना बेदम मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्याच रात्री या परिसरात चार तर कानळदा रस्त्यावर एका ठिकाणी घरफोडी झाली. आताही प्रकाश साहित्या यांच्याकडे पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला. या घटनेतील चौघे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत, मात्र तरीदेखील पाटील पोलिसांना धागादोरा गवसलेला नाही. प्रत्येक घटनेत लाखोंचा ऐवज लांबविला जात आहे. भुसावळ रस्त्यावरील कमल पॅराडाईज या हॉटेलमध्ये चक्क नवरीचेच १४ लाखांचे दागिने व अडीच लाखाची रोकड भर दिवसा लांबविण्यात आली. त्याआधी देखील व्यापारी व वकिलाच्या डिक्कीतून दीड ते अडीच लाखांचा ऐवज लांबविण्यात आला. या घटना सारख्या घडत असताना यंत्रणा कमालीची सुस्त झाल्याचे दिसून येत आहे. शरीराविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणले जात असताना मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या घटना म्हणजे थेट पोलीस अधीक्षकांनाच आव्हान ठरल्या असून गुन्हे शोध व गुन्हे उघडकीस आणणाऱ्या यंत्रणेची मरगळ झटकणे गरजेचे आहे.