- विजयकुमार सैतवाल
जळगाव- कमी पाणी व खडकाळ जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही फुलून गोड फळ देणाऱ्या सीताफळाच्या झाडाप्रमाणे सर्व संकटावर मात करीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देशाला, जगाला गोड स्वर दिला. सीताफळ व दीदींच्या आवाजातील हा गोडवा कोठेही मिळू शकत नाही, यामुळेच आपण आपल्या उद्यानातील सीताफळांना ‘लता’ फळ असे नाव दिले, असे अभिमानाने कवीवर्य ना.धों. महानोर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी जागविताना सांगितले. गेल्या ६२ वर्षांपासून अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पळासखेडा या महानोर यांच्या गावात लता फळ फुलत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त धडकले आणि दीदींसोबत काम करीत असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्याचे ना.धों. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी लता फळाचा आवर्जून उल्लेख केला.
संकटातूनही उभी राहिली अनोखी प्रतिभा
दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्या वेळी लता मंगेशकर केवळ साडे अकरा वर्षांच्या होत्या. इतर भावंडे तर लहानच होते. त्या वेळी आर्थिक स्थिती बिकट असताना घराचे भाडे देणेही कठीण असताना लता दीदी उभ्या राहिल्या व आपल्या गायनातून गोड स्वर दिला, असे महानोर लता फळाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले. सीताफळाचे झाड ज्या प्रमाणे खडकाळ जमिनीत कमी पाण्यात उभे राहून गोड फळ देते त्या प्रमाणेच घरातील बिकट स्थितीतूनही दीदी उभ्या राहिल्या व अजरामर स्वरांची अनोखी प्रतिभाच जगाला मिळाली, असे ना.धों. महानोर यांनी सांगितले. त्यांचा हा खडतर प्रवास सीताफळाच्या झाडाप्रमाणेच असल्याने आपण आपल्या शेतातील उद्यानाला १९६०मध्ये लता मंगेशकर उद्यान नाव देत फळही लता फळ नावाने केल्याचे महानोर यांनी सांगितले.
माझ्या आजोळच्या गाण्यांना खान्देशचा लय!
शेतातील फळांसोबतच गाणे, कवितांविषयीचा अनुभव सांगताना महानोर म्हणाले की, त्यांच्यासोबत ‘जैत रे जैत’ हा चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी दीदींनी मलाच गाणी लिहिण्याचा आग्रह केला. यानिमित्ताने मार्च १९७७मध्ये गुडीपाडव्याचा दिवस त्यांच्या सोबत घालविला तो दिवस माझ्यासाठी मोठा गोड दिवस ठरला, असाही उल्लेख महानोर यांनी केला. त्या वेळी मी १६ गाणे लिहिली. त्यानंतर पुन्हा सहा गाणी लिहायला सांगितली. हे सांगत असताना ‘माझ्या आजोळातील या गाण्यांना खान्देशचा लय असतो’, असे कौतुकाने दीदी म्हणाल्याचे महानोर यांनी सांगितले.
माझ्या शब्दांना दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे माझे भाग्य-
देशाला आपला आवाज देताना सर्वस्व अर्पण करणाऱ्या लता मंगेशकर म्हणजे गीतकार, संगीतकार, कलावंत यांच्यासाठी स्वरसाधनेची अनोखी देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या स्वरांच्या स्पर्शामुळेच ही सर्व मंडळी एका उंचीवर पोहचली. यामध्ये माझ्या शब्दांनादेखील दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे हे माझे भाग्यच आहे, असेही भावनिक उद्गार ना.धों. महानोर यांनी काढले. ‘जैत रे जैत’ या चित्रपटाच्या वेळी माझ्यासह सर्व टीम नवीन होती. त्या वेळी दीदी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या व हा चित्रपट आकाराला आला. त्यानंतर दीदींना मला गाणे लिहिण्याची संधी दिली व माझ्या शब्दांना दीदींचा स्वर मिळत गेला. त्यामुळे ही गाणी अजरामर झाली. राजकारण असो की कोणतेही क्षेत्र असो, काम झाले की त्या व्यक्तीचा विसर पडतो. मात्र लता मंगेशकर या माझ्या प्रत्येक सुख-दु:खात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही महानोर म्हणाले.