जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फुले शाहू आंबेडकर विचारमंच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासमंडळ, विचारधारा प्रशाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन भिमगीत व शाहीरी स्पर्धेत महाविद्यालयीलन गटात नागपूरच्या संकेत विरकर याने तर खुल्या गटात नागपूरच्याच डॉ.पंकज गजभिये यांनी प्रथम क्रमांचे पारितोषिक प्राप्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन फेऱ्यांमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भारताच्या विविध भागांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. ६ डिसेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या स्पर्धेचे परिक्षण शाहीर आझाद कोल्हापूरकर, डॉ. अशोक अभंग आणि अमोल जाधव यांनी केले.
परंपरा जोपासली जात आहे...
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी महाराष्ट्रात भिमगीत व शाहीरीची मोठी परंपरा लाभलेली असून या स्पर्धेच्या निमित्ताने ही परंपरा जोपासली जात असल्या बद्दल आनंद व्यक्त केला. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी अशा स्पर्धांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार होतो असे मत व्यक्त केले. प्रारंभी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. म.सु.पगारे यांनी कार्यक्रमाची भुमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.विजय घोरपडे व वनश्री बैसाणे यांनी केले. आभार स्पर्धेचे समन्वयक डॉ. अजय सुरवाडे यांनी मानले. परीक्षकांनी देखील यावेळी गीत व पोवाडे सादर केले.
असा आहे स्पर्धेचा निकाल
खुला गटातून प्रथम - डॉ. पंकज गजभिये, नागपूर., द्वितीय पारितोषिक राजश्री संदीप मराठे, हैद्राबाद., तृतीय पारितोषिक सपना विनोद वाघ हीने पटकाविला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक रूपये रमेश धुरंधर व विकास सोमजी जाधव, बुलढाणा यांनी प्राप्त केले तर महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक नागपूरच्या संकेत विरकर यांना देण्यात आले.