अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. त्यामुळे मुले आहारपासून वंचित राहिल्याची खंत संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त दिली.अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी विद्यामंदिर, सानेगुरुजी कन्या विद्यालय, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या तीन शाळांमध्ये ३३९५ विद्यार्थी शिकत असून पैकी २३०० विद्यार्थी शालेय पोषण आहार घेतात. १९ जून रोजी शाळेची कूपनलिका आटल्याने पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून संस्थेने पालिका व तहसील कार्यालयात अर्ज देऊन पाणी मिळण्याची विनंती केली. मात्र, टंचाईची परिस्थिती असल्याने पालिका शाळेला पाणी पुरवू शकली नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी शाळेची असल्याने संस्थेने पाण्याचे टँकर मागवून २४ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला. परंतु २५ रोजी पाण्याचे टँकरदेखील मिळाले नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहारच शिजला नाही. विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून बिस्किटे देण्यात आली, असेही घोरपडे यांनी सांगितले.पालिकेने अथवा शासनाने पाणी पुरवावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. पाणी मिळत नाही तोपर्यंत पोषण आहाराबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. पाण्याअभावी जनतेचे हाल होत असताना आता पोषण आहारच मिळत नसल्याने यापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. दरम्यान, येत्या काळात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.