दुसरा डोस देण्याचे काम पूर्ण करा
जळगाव - शहरातील ४५ वर्ष वयाहून अधिक असलेल्या अनेक नागरिकांनी कोरोना चा पहिला डोस घेतला आहे. मात्र, अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. त्यांना लवकरात लवकर मनपा च्या रुग्णालयात स्वतंत्र लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मनपा दवाखानात समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील व डॉ. विरेन खडके यांनी केली आहे.याबाबत सोमवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव - शहरात गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र असे असताना देखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोमवारी देखील दुपारून बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड परिसरात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. तसेच या ठिकाणी अनेक नागरिकांची देखील गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून दहा भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील मालदेखील जप्त करण्यात आला.
मनपाची १२ मे रोजी महासभा
जळगाव- मनपात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर महासभेचे आयोजन १२ मे रोजी करण्यात आले आहे. नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच महासभा ठरणार आहे. कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने ही महासभा देखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. महासभेत एकूण २० हून अधिक विषय राहणार आहेत.