लोकमत न्यूज नेटवर्क
अडावद, ता. चोपडा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’, असे म्हणत एखादं दोन झाड लावून सोशल मीडियावर सेल्फी टाकून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचा आव अनेकजण आणताना दिसतात. परंतु १८५० झाडांची मंजुरी असताना दहा हजार झाडे लावून ते जगविणारे अवलीयाही येथे आहेत. होय. चोपडा तालुक्यातील आदर्शगाव वडगाव बुद्रूक येथील उपसरपंच नामदेव बाबूराव पाटील यांनी दोन वर्षांत तापी नदीकाठच्या बाभूळवाडीतून नंदन‘वन’ साकारले आहे.
तापी काठचे गाव म्हणून वडगाव बुद्रूक ओळखले जाते. या गावाला नदीकाठचा सुमारे १०० हेक्टरचा गावठाण आहे. उंच डेकड्या, डोंगराळ भाग, दऱ्या-खोऱ्या असा भला मोठा परिसर आहे. या सर्व जागेवर काटेरी झाडे, झुडपांच्या बाभूळवाडीचे नंदन‘वन’ नामदेव पाटील यांनी केले आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नुसते कागदोपत्री काम केले नाही, तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण केले. ऑगस्ट २०१९मध्ये या कामास प्रारंभ केला. यासाठी तत्कालीन ग्रामसेवक बापू कोळी यांचेही सहकार्य लाभले. त्यानंतर विद्यमान सरपंच कडू कोळी यांसह ग्रामसेवक के. बी. कोळी यांनी नामदेव पाटील यांच्या कार्यास पुढे नेले. लॉकडाऊनच्या काळात रोजगार हमीच्या माध्यमातून बेरोजगार होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
गावाच्या सांडपाण्यासह एक कूपनलिकेच्या साहाय्याने झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ऑगस्ट २०१९मध्ये नामदेव पाटील सरपंच होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बिहार पॅटर्नअंतर्गत वृक्षलागवड केली. टप्याटप्याने ३ वेगवेगळ्या ठिकाणांची निवड करण्यात आली. प्रारंभी नियोजित जागेवर साफसफाई करणे, काटेरी झाडे, झुडपे काढणे. त्यानंतर वृक्षलागवड करणे. रोपांचे संगोपन व संवर्धन करीत त्या ठिकाणाला पर्यटनाप्रमाणे ‘लुक’ देण्याचा प्रयत्न केला आहे.
बसायला बाक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उंच टेकड्यांवर चढायला पायऱ्या आदींची भर घातली आहे. येण्या-जाण्याच्या मार्गावर रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे लावण्यात आली आहेत. वड, उंबर, पिंपळ, निंब हे जीवनदायी वृक्ष तसेच सीताफळ, रामफळ, आंबा, फणस, लिंबू, आवळा, जांभूळ या फळ झाडांसह अर्जुन, बेहडा, महू, खैर, सिसम, बांबू आदी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या तिन्ही ठिकाणची मिळून सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड व संगोपन तसेच संवर्धन करण्यात येत आहे. आज जवळपास दोन वर्षांची ही झाडे डेरेदार व मोठ्या रुबाबात डोलत आहेत. या कामासाठी चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, ललित पाटील यांचे नेहमी सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे नामदेव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
===Photopath===
200621\20jal_6_20062021_12.jpg
===Caption===
नामदेव पाटील यांनी साकारले बाभूळवाडीत साकारलेले हे नंदनवन.