आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१- ‘भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहरजी का नाम’, ‘जयश्री दादाजी धुनीवाले...’ यांचा जयजयकार करत श्री सदगुरु दादाजी धुनिवाले महाराज यांच्या ८८ वा वार्षिक उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. खेडी परिसरातील श्री हरिहर नित्य सेवा मंडळ संचालित श्री दादाजी दरबारात हा कार्यक्रम झाला. उत्सावानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचे चौका चौकात स्वागत करण्यात आले.
२२ नोव्हेंबर पासून श्री दादाजी विजय ग्रंथचे सामूहिक पारायण सुरु करण्यात आले होते. २४ रोजी २४ तासांची अखंड नामधून म्हणण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पोलनपेठ परिसरातील श्री दादाजी सत्संग केंद्रातून श्री दादाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सुशोभित केलेल्या रथावर दादाजी महाराज यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. शोभायात्रेच्या अग्रभागी ध्वजधारी घोडेस्वार होता. शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला व विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती.
भजन संध्याने उत्सवाचा समारोप
शुक्रवारी सकाळी ६ वाजता दादाजी दरबारात काकडाआरती झाली. त्यानंतर दुपारी २.३० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नर्मदा मातेची आरती कण्यात आली. सायंकाळी ७ वाजता महाआरती होवून रात्री ९ वाजता भजन संध्येने उत्सवाचा समारोप झाला.