जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठातील प्रशाळा, विभाग तसेच प्रशासकीय विभागांचे नावाचे फलक आता मराठी भाषेत झळकणार आहेत. तसा आदेश विद्यापीठाने जारी केला आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे.
राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खासगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. मात्र, विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नव्हते. विद्यापीठातील सर्व विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत. विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे आदी मागणी युवा सेनेकडून मागील महिन्यात कुलगुरु यांच्याकडे केली गेली होती. दरम्यान, या मागणीची दखल घेऊन नुकतेच विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना महाविद्यालय, प्रशाळा, परिसंस्था व विभागांना करण्यात आल्या आहेत.
या आहेत विद्यापीठाच्या सूचना
- सहज दिसेल अशा पद्धतीने महाविद्यालय, परिसंस्था, प्रशाळा, विभाग, प्रशासकीय विभागांच्या नावाचा मराठी भाषेतील फलक दर्शनी भागात लावावा.
- माहिती पुस्तके, प्रवेश अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्यात यावेत.
- पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा.
- सूचना मराठीतून लिहिण्याला प्राधान्य देण्यात यावे.
- कार्यशाळांमध्ये प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा.
- मराठी भाषा गौरव दिन, २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात यावा. या दिवशी विविध चर्चासत्रे, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात यावे.