जळगाव - शिवाजी नगर ते जिल्हा परिषदपर्यंत लवकरच तयार होणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव द्यावे, अशी लेखी मागणी पत्राद्वारे मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानतर्फे महापौर भारती सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. येत्या महासभेत विषय पटलावर हा विषय अग्रक्रमाने घ्यावा, अशी मागणी मराठी प्रतिष्ठानतर्फे महापौरांना करण्यात आली आहे.
प्रभाग ११, १२ मध्ये रस्ते दुरुस्तीला सुरुवात
जळगाव - शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या काव्यरत्नावली चौक ते रामानंद नगर स्टॉप रस्ता दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. गिरणा टाकीजवळ पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला. कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, पार्वता भील, नितीन बरडे, अनंत जोशी, संतोष पाटील, अजित राणे आदी उपस्थित होते.
कॅन्सर ट्युमर, लिव्हर फंक्शन टेस्ट तपासणी
जळगाव - माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यातर्फे शनिवारी छत्रपती शाहू महाराज मार्केटमध्ये साई व्हीजनच्या कार्यालयात सिकल सेल, अनेमिया, कॅन्सर ट्युमर, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉईड, किडनी फंक्शन, शुगर लेव्हर तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कालंका माता चौक परिसरातील अतिक्रमण काढले
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गुरुवारी कालंका माता चौक ते का. ऊ. कोल्हे विद्यालय दरम्यानच्या अतिक्रमणावर जोरदार कारवाई करण्यात आली. या समांतर रस्त्यालगतदेखील मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी दुपारी १२ नंतर या भागात कारवाई करण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांचा मालदेखील जप्त करण्यात आला तर काहींशी वाददेखील झाला.
थंडी परतली, पारा १२ अंशावर
जळगाव - गेल्या आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीचे पुनगरागमन झाले आहे. मंगळवारी १८ अंश असलेले तापमान गुरुवारी १२ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे थंडीची ही लाट पुन्हा काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानासोबत कमाल तापमानातही घट झाली असून, पारा ३१ अंशापर्यंत खाली आला आहे. अजून तीन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.