लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक १८ रोजी होणार आहे. त्यामुळे १७ रोजी महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत' ला दिली आहे. यासह मनपातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक देखील बदलविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्ष नेतृत्वा समोर देखील डोकेदुखी वाढली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांची अंतिम निवड माजी मंत्री गिरीश महाजन हेच करणार आहेत. तरीही इच्छुकांकडून आपापल्या परीने रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हे विधानसभेचा अधिवेशनामुळे या प्रक्रियेपासून अलिप्त होते. मात्र विधानसभेचे अधिवेशन संपल्यामुळे ते शनिवारी शहरात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळेस महापौर व उपमहापौर पदासाठी काही इच्छुकांची बैठक देखील त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र अंतिम नावाची घोषणा ही मंगळवारी होण्याची शक्यता आहे. तसेच इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपात अंतर्गत गटबाजी देखील वाढली आहे. महापौर पदासाठी काही नावे चर्चेत असून काही नावांबाबत नगरसेवकांची नाराजी देखील वाढली आहे. याचा फटका येत्या काळात भाजपला बसू नये म्हणून गिरीश महाजन काही नगरसेवकांशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कापसे व चव्हाण यांच्यातच स्पर्धा ?
महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी प्रतिभा कापसे व ज्योती चव्हाण यांच्या नावातच स्पर्धा निर्माण झाली आहे. महापौरपद मराठा समाजाला मिळणार असल्याचेही निश्चित असले तरी चव्हाण व कापसे यांच्यापैकी कोणाला संधी मिळते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रतिभा कापसे यांचे पती चंद्रकांत कापसे यांना भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळेस महापौर पदासाठीचा शब्द भाजप पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचेही चर्चा सध्या सुरू आहेत. तर ज्योती चव्हाण या देखील भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांनीही महापौर पदावर आपला दावा दाखल केला आहे.
स्वीकृत नगरसेवकही बदलविणार
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर मनपातील भाजपचे चारही स्वीकृत नगरसेवक बदलण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या माहितीला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दुजोरा दिला आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी देखील आता भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान उपमहापौर पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी गिरीश महाजन जो निर्णय घेतील तोच निर्णय मान्य राहील अशीही माहिती काही इच्छुकांनी ‘लोकमत’ला दिली.