जळगाव : भादली ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, भुसावळ, जळगाव येथील मतदारांची नावे असल्याची तक्रार भादली बुद्रूक येथील ग्रामस्थांनी तालुका निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
भादली बुद्रूक ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये वॉर्ड क्रमांक पाचमध्ये मुंबई, पुणे, जळगाव, भुसावळ येथील मतदारांची नावे आहेत. या निवडणुकीत ग्रामीण भागात मतदारांची नावे आहेत. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात, एका गावातून दुसऱ्या गावात तसेच खेड्यातील रहिवाशांचे महानगरात व महानगरातील नावे खेड्यात परत नोंदविण्यात आली आहेत. बीएलओंनी दुबार नावे वगळण्याबाबत संबंधित मतदारांना नोटिशी देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन ते तीन पंचवार्षिक निवडणुकापासून मतदारांची दुबार नावे आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बीएलओंना आदेश देऊन दुबार नावे वगळावी, अशी मागणी ग्रामस्थ राजेंद्र चौधरी, गोपाळ ढाके, गलू ठोसर, छगन खडसे यांनी तक्रारीतून केली आहे.