जळगाव : पाळधी येथे रिंगणगाव रस्त्यावर सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी कारवाई केली. यात जळगाव मनपामधील माजी लोकप्रतिनिधींसह काही सरपंच व इतर जुगारी मिळून आले. गणापुरे यापैकी कुणालाही ओळखत नसल्याने कारवाईचे पुढील सूत्र स्थानिक पोलिसांकडे सोपवून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी मोठा झोल केल्याची चर्चा जोरात रंगत आहे.
पाळधी गावापासून काही अंतरावर रिंगणगाव रस्त्यावर एका शेतात हा जुगार अड्डा सुरू होता. एका गावातील सरपंच व जळगाव शहरातील काही बड्या व्यक्तींची यात भागीदारी असल्याची माहिती हाती आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हे गाव आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी हा जुगारअड्डा उधळून लावून धरणगाव पोलीस निरीक्षक व पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक यांना चपराक दिली. त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले हे धंदे त्यांना माहीत नाही, असेही म्हणता येणार नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचाही या गावात सतत वावर असताना त्यांनाही या धंद्यांची कल्पना नव्हती का, असाही सवाल विचारला जात आहे.
१५ लाखाच्यावर रोकडची चर्चा
गणापुरे यांनी उधळलेल्या या जुगार अड्ड्यावर १५ लाखाच्या वर रोकड आढळून आल्याची जोरदार चर्चा आहे, असे असताना पंचनाम्यात फक्त २ लाख ८६ हजार रुपये दाखविण्यात आले. गणापुरे निघून गेल्यानंतर बडे राजकारणी असलेल्या जुगाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी पध्दतशीरपणे वगळले असून रात्री २ वाजेपर्यंत हा घोळ सुरु होता, अशीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. सुरुवातील जुगाऱ्यांची २२ संख्या सांगितली जात असताना प्रत्यक्षात कागदावर १९ जणांना घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या आर्थिक झोलविषयी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अवैध धंद्यांना हिरवा सिग्नल मिळाल्याची देखील जिल्हाभरात चर्चा रंगू लागली असून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाकडून होत असलेल्या कारवाईवरून सिध्द होत आहे.