सुविधा : मालाच्या वाहतुकीसाठी हेल्पलाईनही सुरू
जळगाव : गेल्या वर्षीपासून पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून एस. टी. महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीचे १ मे पासून 'महाकार्गो' सेवा असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच मालाच्या वाहतुकीबाबत व्यावसायिकांसाठी महामंडळातर्फे हेल्पलाईनची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी सहा महिने महामंडळाची सेवा बंद होती. यामुळे महामंडळाचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी कर्मचाऱ्यांचे अनेक महिने पगार रखडले. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी महामंडळाने पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून गेल्या वर्षापासून माल वाहतूक सेवा सुरू केली आहे. सुरुवातीपासून या सेवेला लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता या सेवेचा अधिक विस्तार वाढविण्यासाठी आणि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांपर्यंत या सेवेची माहिती पोहोचविण्यासाठी विविध बदल करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. यामध्ये प्रथम १ मे महाराष्ट्र दिनापासून या सेवेचे 'महाकार्गो' सेवा नामकरण करण्यात आले आहे.
तसेच या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रंगसंगती बदलविण्याचे आदेश देण्यात आले असून, या सेवेबाबत प्रत्येक आगारात फलक लावून जनजागृतीचे करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आदेशानुसार जळगाव विभागातील एकूण ५८ मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रंगसंगती बदलविण्याचे काम सुरू असल्याचे जळगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र हेल्पलाईनची सुविधा
महामंडळातर्फे या सेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा, तसेच व्यापाऱ्यांना तत्काळ ही सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महामंडळातर्फे ०२२ - २३०२४०६८ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक माल वाहतुकीच्या वाहनांवर टाकण्यात येणार आहे. जे नागरिक, व्यापारी या क्रमांकावर संपर्क साधतील, त्या व्यापारी किंवा उद्योजकाचा मोबाईल क्रमांक संबंधित कार्यक्षेत्रातील माल वाहतूक कक्षाच्या प्रमुखाला कळविला जाईल. त्यानंतर माल वाहतूक कक्ष प्रमुखाने त्या व्यापाऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या मालाची योग्य ती काळजी घेऊन वाहतूक करण्याच्या सूचना महामंडळ प्रशासनाने दिल्या आहेत.