आनंद सुरवाडे
जळगाव : आयसीएमआरकडून सहा जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात झालेल्या चौथ्या सिरो सर्व्हेत नांदेड व परभणी मधील संकलीत रक्तनमुन्यांपैकी ६० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या ठिकाणी प्रत्येकी ६० टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. या सहा जिल्ह्यांमध्ये ५१ टक्क्यांसह जळगाव पाचव्या क्रमांकावर आहे. तर बीड जिल्ह्यात हे प्रमाण सर्वात कमी ४२ टक्के नोंदविण्यात आले आहे.
यंदाच्या सर्व्हेत प्रथमच बालकांचेही नमुने घेण्यात आले होते. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सर्व सहा जिल्ह्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांमध्ये ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. यात सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात ९१.१ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये या ॲन्टिबॉडिज् आढळून आल्या आहेत. गेल्या वेळीच्या सर्व्हेच्या तुलनेत आता हे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्याही पहिल्या लाटेपेक्षा अधिक होती. तिसरा सर्व्हे हा ऑगस्ट महिन्यात झाला होता. साधारण दहा महिन्यांनी हा चौथा सिरो सर्व्हे झाला आहे.
असे आहे प्रमाण
नांदेड ६० टक्के
परभणी ६० टक्के
अहमदनगर ५८ टक्के
सांगली ५३ टक्के
जळगाव ५१ टक्के
बीड ४२ टक्के