जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निर्षधार्थ शिवसेनेने आंदोलन करीत घोषणा देत थेट भाजपच्या बळीराम पेठेतील कार्यालयात धडक दिली. यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात थेट जीवंत कोंबड्या फेकल्याव कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये झटापट होऊन प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून सुरूवातीला सकाळी टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी हे राणे यांच्याविरोधात घोषणा देत थेट भाजप कार्यालयावर धडकले. यावेळी शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरपालिका विरोधीपक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विराज कावडीया यांच्यात व भाजपच्या युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलीस उपस्थित होते. शिवसैनिकांचे हे आंदोलन पोलिसांच्या संरक्षणात झाले असल्याचा आरोप भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केला आहे.