फोटो आहे
नशिराबाद : विजेचे थकीत बिल न भरल्याने पथदिव्यांची व पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आल्याने आणि वीज कंपनी सुद्धा ग्रामपंचायतीचे थकीत कर भरत नसल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात राहत आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांसह नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मेणबत्त्याचा आहेर देऊन आता तरी दिवे लावा दिवे अशी मागणी केली. ग्रामविकास अधिकारी बी.एस. पाटील यांना या मेणबत्त्या देण्यात आल्या.
नशिराबाद ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे सुमारे ८९ लाख व पाणीपुरवठ्याचे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची व पाणी पुरवठ्याची वीज खंडित केली आहे. त्यामुळे गावात अंधार व जलसंकट उभे आहे. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असून गावातील मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
ग्रामपंचायतच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे कारण सांगितले जात आहे. वीज वितरण कंपनीकडे सुद्धा ग्रामपंचायतीचे लाखो रुपये घेणे आहे. मात्र वीज कंपनी अगोदर थकीत बिले भरा मगच वीज पूर्ववत सुरू करू, अशा इशारा दिला आहे. आता ग्रामपंचायतनेदेखील वीज वितरण कंपनीकडे असलेल्या थकीत करापोटी उपकेंद्राला जप्ती व सील करण्याचे पावले उचलत आहे. या दोघांच्या परस्परातील थकबाकीमुळे ग्रामस्थ मात्र वेठीस धरले जात आहे. गावात चोरांचा शिरकाव होऊन भुरट्या चोऱ्या वाढू लागल्या आहेत.
या सर्व प्रकाराला कंटाळून नागरिकांनी ग्रामपंचायतीला मेणबत्त्या भेट दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष दगडू माळी, शहर उपाध्यक्ष बंडू रत्नपारखे, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, भूषण कोल्हे आदी उपस्थित होते.