लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच वाढत असून अर्ज दाखल करण्यासह गावातील प्रचाराचे नियोजन केले जात आहे. हे करीत असताना यामध्ये मतदारांपर्यंत कसे पोहचायचे याचाही विचार केला जात आहे. नशिराबाद सर्वात मोठी ग्रामपंचायत असून वडनगरी हा सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. उमेदवारांची नशिराबाद येथे अधिक तर वडनगरी येथे त्या तुलनेत कमी दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यात आसोदा, धानवड, कानळदा, भादली बु., कठोरा, शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो., फुपनी, म्हसावद, ममुराबाद, कानळदा, वडनगरी, नशिराबाद, कंडारी, पिलखेडा, सावखेडा बु., दापोरा, धानोरा बु., चिंचोली, रायपूर, जळगाव खु.-तिघ्रे खिर्डी, रामदेववाडी, शेळगाव-कानसवाडे, तरसोद, तुरखेडा, नांद्रा खु.-खापरखेडा, कुसुंबा खु., उमाळे-देव्हारी, आव्हाणे, फुपनगरी, भोकर, बोरनार, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, नांद्रा बु., मोहाडी, गाढोदे, वडली, जवखेडा, वावडदा, कडगाव, तरसोद, रिधूर, डिकसाई समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशीही केवळ दोनच अर्ज दाखल झाले होते. त्यांनतर तीन दिवस सुट्या आल्या. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. यात सर्वात मोठ्या नशिराबाद ग्रामपंचायतसाठी चार तर वडनगरीसाठी एक अर्ज दाखल झाला होता.